प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

यूरोपांतील वैचारिक स्थित्यंतर.- मध्ययुगांत यूरोपांतील अनेक शहरांत व युनिव्हर्सिट्यांत ज्ञानविषयक नव्या नव्या कल्पनांची जी लाट सुरू झाली होती व ज्या लाटेचें एक अंग म्हणून प्रॉटेस्टंट धर्मपंथांतील वैयक्तिक मत स्वातंत्र्याचें तत्त्व पुढें आलें होतें. त्या लाटेला पुढील शतकांत दुहेरी स्वरूप प्राप्त झालें. पहिलें स्वरूप, अनियंत्रित एकतंत्री राजसत्ता नष्ट करून लोकनियंत्रित राज्यव्यवस्था देशोदेशी स्थापन करण्याची चळवळ हें होय. आणि दुसरें स्वरूप ख्रिस्ती सांप्रदायिक बायबली मतें अग्राह्य ठरवून शास्त्रीय नूतन संशोधनानें सिद्ध झालेलीं मतें प्रस्थापित करण्याची चळवळ हें होय. एकीकडे, राज्यकारभार पद्धतींतील घडामोडी संबंधानें पाहतां हॉलंड व स्वित्सर्लंड या देशांत सांघिक राज्यकारभारपद्धतीच्या (फेडरल गव्हर्नमेंट) कल्पनेला मूर्तस्वरूप देण्यांत आलें. आणि इंग्लंडमध्यें लोकनियुक्त मंत्रिमंडळायत्त राज्यकारभारपद्धतीचा (कॅबिनेट गव्हर्नमेंट) पाया घातला गेला. दुसरीकडे कोपर्निकस, केपलर, बेकन, गॅलीलिओ व न्यूटन या शास्त्रज्ञांनीं शास्त्रीय संशोधनाचें काम, प्राचीन ग्रीक राष्ट्राचें रोमन लोकांनीं व सॅरासन लोकांनीं निर्दालन केल्यामुळें ज्या ठिकाणीं खुंटून पडलें होतें तेथून पुढें चालू केलें. उत्तर जर्मनीनें या शास्त्रीय संशोधनाच्या व ख्रिस्तीधर्मसुधारेणच्या कार्यास थोडाफार हातभार लावला हें खरें असलें तरी विशिष्ट भौगोलिक परिस्थितीच्या कचाट्यांत सांपडल्यामुळें जर्मनीनें लष्करी सामर्थ्य अधिकाधिक वाढवून लष्करी सोटेशाहीचा बाणा अधिकाधिक स्वीकारला. फ्रान्स बाण्याचा व कॅथॉलिक पंथाचा होता तरीहि त्यानें ट्यूटानिक वंशी यूरोपीय समाज व लॅटिन वंशी यूरोपीय समाज यांच्यामध्यें मध्यस्थाचें काम करण्याचें धोरण चालू ठेवलें. इंग्रज तत्त्ववेत्ता लॉक यानें राजकीय हक्कांच्या क्षेत्रांतील स्वातंत्र्य व समता या कल्पना तात्त्विक स्वरूप देऊन पुढें मांडिल्या त्या युनायटेड स्टेट्सनें इंग्लंडविरूद्ध स्वातंत्र्यप्राप्त्यर्थ उभारलेल्या बंडांत मान्य केल्या, इतकेंच नव्हे तर फ्रान्समध्येंहि राज्यक्रांतीच्या काळांत त्याच कल्पना लोकांनीं ध्येय म्हणून अंगीकारल्या.