प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

व्हिकिंग किंवा नॉर्स लोक.- ज्या ठिकाणीं ख्रिस्त्यांचा किंवा मुसुलमानांचा त्रास नाहीं, अशा फ्रँक आणि लॅटिन जगाच्या बाहेरील अगदीं उत्तरेकडच्या प्रदेशांत, चार्लस दि ग्रेटच्या कालाच्या थोडें आगेंमागें, जर्मन सदृश असणारी एक आर्यांची जात उदयास आली. आज स्कँडिनेव्हियन नॉर्स लोक किंवा व्हिकिंग फार थोडे दिसतात. इतर मानववंशांनां उत्तेजित करणें हे जणूं काय त्यांचे ब्रीद होतें. त्यांची हालचाल समुद्रावरची होती व माळरान किंवा ओसाड अरण्य यांपेक्षां महासागर विस्तीर्ण असल्यानें, अश्वजन किंवा उष्ट्रजन यांच्यापेक्षां व्हिकिंग्सची सत्ता शेवटीं जास्त ठरली हें साहजिक होय. पश्चिमेकडे यूरोपीय द्वीपकल्पाच्या सर्व किना-यांनां त्यांनीं वेढून टाकिलें. पूर्वेकडे बाल्टिक ओलांडून रशियन स्लावांवर त्यांनीं अम्मल बसविला. ब्रिटनमध्यें आलफ्रेड राजाच्या आधिपत्याखालीं अँगल आणि सॅक्सन लोकांनीं त्यांनां तोंड दिले; पण इतर यूरोपखंडांत त्यांना फारसा अडथळा न होऊन, त्यांनीं कारोलिंगियन राज्य विस्कळित केले; व अशा रीतीनें नकळत धर्मसंस्थेला साम्राज्य बुडविण्याच्या कामीं त्यांनीं चांगली मदत दिली, असा एक प्रकार सीन नदीच्या कांठीं घडला. त्या ठिकाणीं नॉर्मन संस्थानाच्या धास्तीमुळें पारिस येथें एक रोमान्स राज्य उदयास आलें व त्यानें हळू हळू साम्राज्याचा अधिकार झुगारून दिला. नार्मन विल्यमनें इंग्लंड जिंकण्यांत व पुढील इंग्लंड आणि फ्रेंच यांच्या भांडणांत आपणाला अशी एक क्रिया दिसून येते कीं, जीमुळें फ्रँक व लॅटिन कुळांत अर्वाचीन बलिष्ठ राष्ट्रांचा जन्म झाला. कोकिळा ज्याप्रमाणें दुस-याच्या घरट्यांत आपलीं अंडीं घालतें त्याचप्रमाणें या व्हिकिंग कोकिळेनें फ्रँक व लॅटिन घरट्यांत हीं राष्ट्ररूपीं अंडीं उबविलीं. घरटीं बांधणारें जें रोमन साम्राज्य व धर्मसंस्था यांच्यांत वितुष्ट आल्यामुळें हा प्रकार घडला; शिवाय बिझँशियमनें माळरान व ओसाड अरण्य यांत राहणा-या व्हिकिंगपेक्षां जास्त प्रबल अशा परोपजीवी पक्ष्यांनां अटकाव केला होता. या अवधींत नैर्ॠत्येस स्पेनमध्यें एक सामर्थ्यवान् व असहिष्णु राष्ट्र उदयास येत होतें.

अशा रीतीनें १३ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटन, फ्रान्स आणि स्पेन हीं आपापल्या राज्यांत बलिष्ठ होऊन राहिलीं होतीं. यावेळीं पोपराज्यानें जिकडे तिकडे साम्राज्याचा पाडाव करून टाकिला होता व याचा परिणाम म्हणजे, लॅटिन-खिश्चन जगांत कांहीं आपल्या शक्तीचा पुरा अजमास न लागलेलीं राज्यें, व कांहीं आपल्या दुर्बलतेचा नीट थांग न लागलेलीं लहान सहान जर्मन व लॅटिन संस्थानें नांदूं लागलीं होतीं. तुर्कांनीं बिझ्रशियमचा पाडाव करून काँन्स्टँटिनोपल इस्लामला जोडण्यापूर्वींचीं दोन शतकें अशीं गेलीं कीं, त्या काळांत जुनें जग मृत्युपंथास लागलें होतें व नवीन जग उदयोन्मुख झालें होतें व या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेंकरून घडत होत्या हें विशेष आहे. प्राचीन ग्रीसमधील नगर-राज्यांतून जसें घडून आलें त्याप्रमाणें पुढील काळांतील मध्ययुगांत जर्मनी आणि इटली या राष्ट्रांमध्यें राजकीय दुर्बलतेपासून अशा त-हेचा एक नवा जोम उत्पन्न झाला कीं, त्यामुळें पुढील शतकें राजकीय घडामोडींच्या दृष्टीनें विशेष कार्यकारी व महत्वाची झालीं. एका बाजूला हॅन्सियाटिक, स्वेबियन व उत्तर इटालियन शहरांनीं व्यापारविषयक कार्य सुव्यवस्थितपणें हातीं घेतलें व होकायंत्रांचा उपयोग समुद्रावर दूरदूरच्या सफरी करण्याच्या कामीं करण्याची सुरूवात केली. दुस-या बाजूला ख्रिस्ती संप्रदायाच्या आश्रयाखालीं लॅटिन भषा बोलणा-या अनेक युनिव्हर्सिट्या निघून त्यांनीं ज्ञानाच्या क्षेत्रांत स्वतंत्र संशोधनास चांगली चालना दिली.