प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
रशिया - रशियानें आशियाकडील सैबेरियाचा पॅसिफिक महासागरापर्यंतचा प्रदेश नवीन वसाहतींनीं व रेल्वेच्या फांट्यांनीं व्यापून टाकला आहे. जपानबरोबर झालेल्या युद्धांत पराभव झाल्यामुळें रशियाला जबरदस्त धक्का बसला. त्या धक्क्यानें जागृत झालेल्या रशियांत प्रशियाप्रमाणें एकतंत्री पण महाकार्यक्षम राज्यपद्धति सुरू होणें किंवा फ्रान्सप्रमाणें पूर्णपणें लोकसत्ताक राज्यपद्धति सुरू होणें या दोहोंपैकीं कोणती तरी एक योष्ट घडून येणार हें निश्चित होतें. त्याप्रमाणें झारची अनियंत्रित सत्ता कांहीं काळ चालली. गेल्या महायुद्धाच्या बिकट परिस्थितीमुळें मस्त झालेल्या जनतेनें क्रांति करून बोल्शेविक सत्ता स्थापन केली व पुढें राजघराण्यांतील माणसांस ठार मारून राजसत्तेचा बीमोड केला.
बोल्शेविकांनी प्रथम जुनी व्यवस्था मोडून टाकण्याच्या ब-याच अव्यवस्थित व अतिरेकाच्या गोष्टी केल्या व खासगी मालमत्ता नाहींशी करून परराष्ट्रीय कर्जहि नाकबूल केलें. बोल्शेव्हिकांनीं स्त्रिया सार्वजनिक मालकीच्या केल्या अशीहि एक अफवर उठली होती. परंतु हळूहळू अतिरेकाच्या गोष्टी एक एक कमी होत गेल्या व त्यांची राज्यपद्धति जास्त सुसंघटित होऊं लागली. परकीय राष्ट्रांनींहि बोल्शेव्हिकांवर घातलेला बहिष्कार हळूहळू कमी केला व त्यांची बोल्शेव्हिकांविषयींची भीति कमी कमी होत गेली. इंग्लंड वगैरे राष्ट्रांनीं रशियाशीं व्यापारी तह केले व पुढें जिनोवा परिषदेतहि रशियाला अंतर्भूत केलें.
रशियाची सध्यांची शासनघटना पहिल्या विभागांत दिलीच आहे. तीवरून असें दिसून येईल कीं कोणत्याहि लोकांच्या इच्छेविरुद्ध बोल्शेव्हिक सत्ता त्यांच्यावर लादली जात नाहीं, तर प्रत्येक प्रांताला अगर राष्ट्रकाला पूर्ण स्थानिक स्वायत्तता असून कांहीं विशिष्ट बाबतींतच त्यावर मध्यवर्ती सरकारची सत्ता चालते. यामुळें लष्करी सत्तेच्या जोरावर सत्ता वाढविणें हे रशियन सरकारचें ध्येयच नाहीं. रशियाला सैन्य अगर आरमार ठेवावयाचें तें स्वसंरक्षणापुरंतेच ठेवावयाचें त्यामुळें परराष्ट्राशीं वितुष्ट येण्याचें कारण नाहीं. कदाचित् सैबेरियाबद्दल चीन किंवा जपानकडून कुरापत निघून रशियाला युद्धांत पडण्याची पाळी येण्याचा संभव आहे. तसेंच रशियाचा व्यापारहि फारसा वाढलेला नाहीं; त्यामुळें त्या बाबतींतहि रशियाला लढाई करण्याचें वगैरे कारण नाही. रशियाशीं तंटा होण्याचें जर कांहीं कारण आज असेल तर बोल्शोव्हिक मतप्रसार एवढेंच संभवते.