प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

अमेरिका.- साठ वर्षांपूर्वींच्या आपसांतील युद्धानंतर अमेरिका पुन्हां पूर्णपणें एकजीव होऊन आपल्या देशांतील अवाढव्य सुपीक जमीन शेतकरी वर्गानें व्यापून टाकण्याचें काम पुरें करीत आली आहे. अमेरिकेनें देशाच्या पूर्व टोंकापासून पश्चिम टोंकापर्यंत रेल्वेचे अनेक रस्ते बांधून सर्व खंड सुलभ रीतीनें ओलांडून जाण्याचे हमरस्ते तयार केले आहेत. भौतिक सुधारणा आणि उद्योगधंद्यांची अतोनात वाढ करण्याचें तर अमेरिकेंत जणूं काय वेड लागून राहिलें आहे. अठराव्या शतकांत प्रचलित असलेल्या ज्या कल्पनांच्या आधारावर तिनें आपली स्वतंत्र स्वराज्याची इमारत उभारली होती तिचा पाया अलीकडे डळमळूं लागला असून नव्या साम्राज्यविषयक कल्पना ग्राह्य करणें अमेरिकेला भाग पडत चाललें आहे. पेकिनवर स्वारी करून जाण्यांत अमेरिकेनें भाग घेतला. पासिफिक महासागरांतील कित्येक वसाहती जिंकून त्यांच्यावर साम्राज्य सत्ता तिनें चालू केली आहे. पनामाचा कालवा तयार केला आहे आणि दक्षिण अमेरिकेंत शांतता राखण्यासंबंधींची मनरो डॉक्ट्रिनप्रमाणें पडणारी स्वतःवरची जबाबदारी हळू हळू ती मान्य करीत आहे. या सर्व कारणांकरितां अमेरिकेला स्वत:चें मोठें आरमार ठेवणेंहि भाग आहे. तथापि आज तरी अमेरिका साम्राज्य वाढविण्याकरितां प्रत्यक्षपणें कोणतीहि हालचाल करीत नाहीं. मात्र अमेरिकेमध्यें नवीन येणा-या आगंतूंवर नवीन नवीन नियम लादले जात आहेत व अमेरिकन नागरिकत्वाचे हक्क देण्यासंबंधीं नियमांचा अर्थहि संकोचित करण्यांत येत आहे व हिंदुस्थानच्या रहिवाशांच्या बाबतींत या नियमांमुळें अडथळा उत्पन्न झाला आहे. यूरोपांतील अनेक राष्ट्रातील आगंतूंवर तितके कडक नियम आज नाहींत. पण पुढेंमागें या बाबतींत कदाचित् अमेरिकेस यापेक्षां कडक धोरण स्वीकारावें लागेल. चालू नियमांमुळें जपान किंवा चीनशीं वितुष्ट येण्याचा संभव आहे.

फिलीपाइन्स बेटांनां दिलेल्या स्वातंत्र्यावरून अमेरिका पासिफिक किंवा हिंदी महासागरांतील बेटांवर साम्राज्य वाढविण्याचा प्रयत्न करील असें दिसत नाहीं मात्र दक्षिण अमेरिकेतील राजकारण आपल्याला अनुकूल अशा पद्धतीनें चालावें याबद्दल खटपट अमेरिकेला नेहमीं करावी लागेल.

तसेंच अमेरिकेचा व्यापार जो महायुद्धामुळें अतिशय वाढला आहे तो तसाच कायम ठेवणें अगर अधिक वाढविणें या गोष्टीकडे अमेरिकेचें लक्ष्य अधिक लागेल. तसेंच अमेरिकेमध्ये या महायुद्धकालीन व्यापारामुळें आलेला अलोट पैसा तेथील सावकारांस कदाचित् परकीय देशांत गुंतवावा लागेल व त्या परकीय देशांत गुंतलेल्या भांडवलाची सुरक्षितता व अमेरिकेला व्यापाराच्या बाबतींत सध्यां मिळत असलेल्या जकातीच्या वगैरे सवलती कायम ठेवणें अगर नविन मिळविणें हे अमेरिकेच्या आरमारी सत्तेवर अवलंबून राहील व या बाबतींत कदाचित् पुढें मागें अमेरिकेचा इंग्लंड अथवा जपान या आरमारी व व्यापारी राष्ट्रांशीं तंटा होईल.