प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

इंग्लंड - फ्रान्सचा १८ व्या शतकांतील झगडा.- कॅथोलिकपंथी फ्रान्सनें हें जें राजकीय सत्तावर्चस्व संपादन केलें तें कॅथोलिकपंथी स्पेन व आस्ट्रिया यांच्या विरूद्ध प्रॉटेस्टंटपंथी उत्तर यूरोपला मदत करण्याचा डाव खेळून केलें. सदरहू कालावधींत म्हणजे १५ व्या शतकांतील शत वार्षिक युद्धानंतरच्या आणि १७ व्या शतकाच्या अखेरीच्या व्यापारविषयक युद्धे सुरू होण्यापूर्वींच्या काळांत फ्रान्सनें इंग्लंडबरोबर कोणतेहि महत्वाचें युद्ध केले नाहीं, या गोष्टी वरून फ्रान्सच्या मनांत कोणता डाव साधावयाचा होता ही गोष्ट अधिक स्पष्टपणे निदर्शनास येते. उपयुक्त सामन्यांत पूर्ण विजयी झाल्यावर फ्रान्सनें आपला मोर्चा इंग्लंडकडे वळविला. १८ व्या शतकांच्या फ्रान्सबरोबर झालेल्या अनेक युद्धांत इंग्लंडनें स्वतः प्रॉटेस्टंटपंथी असूनहि कॅथोलिकपंथी आस्ट्रियाचा पक्ष अनेकदा स्वीकारला ही गोष्ट यूरोपच्या इतिहासांतील त्या शतकांत पारमार्थिक हेतूपेक्षां राजकीय हेतू अधिक बलिष्ठपणे वावरत होते हें स्पष्ट दर्शविते. यासंबंधानें आणखी ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे कीं, स्पेनचें कर्तव्य यूरोपच्या संरक्षणाच्या दृष्टीनें संपलें होतें परंतु आस्ट्रियाचें संपलें नव्हतें. कारण मूर लोक हतवीर्य बनत चालले होते पण तुर्क लोक बलिष्ठ बनत होते; व या तुर्कांच्या वाढत्या सत्तेपासून यूरोपचे संरक्षण करण्याचें काम आस्ट्रियाच्या शिरावर पडलें होतें.

अशा परिस्थितींत फ्रान्सनें परस्पर विरोधी धोरण स्वीकारले. इंग्लंडबरोबरच्या सामन्यामुळें फ्रान्सला सांप्रदायिक दृष्ट्या कॅथोलिक पंथाचाच पुरस्कार करणें प्राप्त होते परंतु उलट पक्षीं आस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग बादशहांच्या साम्राज्य सत्तेशीं झगडावयाचें असल्यामुळें कॅथॉलिकपंथी आस्ट्रियाशी विरोध करून उत्तर जर्मनींतील प्रॉटेस्टंट सत्तेशीं राजकीय सख्य करण्याचें विसंगत धोरण फ्रान्सनें चालविलें. हॉलंड हें बोलून चालून लहान राष्ट्र होतें. या राष्ट्रानें स्वतःच्या स्वाभाविक परिस्थित्यनुरूप जगाला कांहीं कांहीं नव्या कल्पनांची जोड करून दिली. उदाहरणार्थ, लहान लहान लोकसत्ताक संस्थानांचा संघ बनवून त्याची राजकीय घटना त्यानें तयार केली. तसेंच जॉइंट-स्टॉक कंपन्या म्हणजे समाईक भांडवलाच्या कंपन्या बनवून मोठमोठे व्यापारधंदे कसे चालवावे याचें उदाहरण जगाला घालून दिलें. परंतु राजकीय वर्चस्वाकरितां यूरोपांतील प्रमुख राष्ट्रांत जी युद्धें झालीं त्यांत या लहान राष्ट्राला मुळींच महत्त्वाचा भाग घेतां आला नाहीं. इंग्लंडनें यूरोपखंडांत जमिनीवर लष्करी सामर्थ्यानें विजय मिळविण्याचें धोरण सोडून देऊन दूरवर उत्तर अमेरिकेंत आणि हिंदुस्थानांत फ्रान्सला पराभूत करून समुद्रावर आपले आरमारी वचस्व प्रस्थापित केले. फ्रान्सला इंग्लंडबरोबर जमीन आणि समुद्र यावर जो दुहेरी सामना द्यावा लागला त्यामध्यें चौदाव्या लुईच्या नेतृत्वाखालीं फ्रान्सची सर्व सत्ता पारिस येथें केंद्रीभूत होऊन ते एक बलिष्ट सत्ताधारी एकतंत्री राज्य बनलें.