प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

ख्रिस्तीसंप्रदाय.- ख्रिस्तीसंप्रदायाचा इतिहास अवगत करून घेण्यास रोमची त्रिभंगलेली स्थिति लक्षांत घेणें अत्यावश्य आहे. हिब्रू एकेश्वरीमत, कांहीं पंथांतून ग्रीक तत्वज्ञान व इजिप्तमधील मूर्तिपूजा यांयोगें बरेच स्पष्ट झालेलें होतें. तेव्हां या जमीनींत खैस्त्यमत- बीज पेरण्यांत आलें. भूमध्यसमुद्राभोंवतीं रोमनांनी स्थापलेली शांतता मतप्रसाराला फार उपयोगी पडली. पण हे ख्रिस्तीसंप्रदायाचें बीज ज्या ज्या जमीनींत यावेळीं पडलें त्या जमिनी एकाच प्रकारच्या नव्हत्या. पश्चिम लॅटिन प्रदेशांत रोमन कायद्याच्या पाठिंब्यामुळें त्याचें झाड तयार झालें. बिझांशिअमकडे पूर्वभागांत ग्रीक तत्त्वज्ञानाशीं त्याला झगडावें लागले व अनेक पाखंडी पंथांनीं त्याचा कोंडमारा केला; सेमेटिक आणि इजिप्शियन पूर्वराष्ट्रांत महंमदाच्या एकेश्वरी संप्रदायानें त्याला पार धुडकावून लाविलें. यरूशलेमबाहेर पडलेल्या ख्रिस्तेतर ज्यूलोकांनीं मोठ्या आश्चर्यकारक प्रभावानें एक चवथाच पंथ निर्माण केला.