प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

जपान.- जपानला आपलीं बंदरें व्यापाराकरितां खुलीं करणें पाश्चात्त्य देशांनी भाग पाडल्यामुळें जपाननें पाश्चात्त्य देशांवर पाश्चात्त्यांचीच युद्धकला व हत्यारें वापरण्यास शिकून एकप्रकारचा सूड उगविला. जपानमध्यें सामुराई म्हणून प्रसिद्ध असलेल्या लढाऊ क्षत्रियवर्गानें अखिलजपानी समाजांत मिसळून जाऊन सर्व लोकांत क्षात्रवृत्ति पसरविली. सर्व देशभर उत्कट देशाभिमानाचें जें वारें संचरलें त्यामुळें जपाननें अनेक अंगांनीं आपली कार्यक्षमता वाढविली; व चीन बरोबरच्या युद्धांत पोर्ट आर्थर बंदरासंबंधाने जपानला जी अडचण भासली ती दूर करण्याकरितां रशियासारख्या अवाढव्य व पाश्चात्त्य संस्कृतींतल्या देशांशींहि युद्ध करून त्यांत विजय संपादन केला. जपानच्या या अभ्युदयामुळें पाश्चात्त्य जगांत ख्रिस्ती खेरीज इतर लोकांच्या नैतिक कल्पना वावरूं लागल्या असून त्यामुळें ख्रिस्ती समाजामध्यें काय फेरबदल होतात ते पहाण्यासारखें आहे.

जपाननें जरी रशियासारख्या यूरोपीय राष्ट्रावर विजय मिळविला तरी जपानचें सामर्थ्य त्यामुळें आज कोणत्याहि यूरोपीय सत्तेच्या तोडीचें आहे असें खात्रीनें सांगतां येण्यासारखें नाहीं.

तसेंच जपाननें रशियाशीं जो अतिशय सवलतीचा तह केला त्याचें कारण जपानचा उदारपणा नसून इतर यूरोपीय राष्ट्रांस आपणाबद्दल हेवा वाटूं नये अगर त्वेष उत्पन्न होऊ नये हें असावें असें मानणेंत जास्त सयुक्तिक होईल. कारण रशिया हें यूरोपांत मागसलेलें राष्ट्र म्हणूनच गणण्यांत येतें. तेव्हां जपानची शक्ति अद्यापि यूरोपांतील पहिल्या वर्गांतील राष्ट्राशीं अजमावली जावयाची आहे. गेल्या महायुद्धांत जपान जरी इंग्लंडशीं असलेल्या दोस्तीखातर महायुद्धांत पडलें तरी जवळचेच किआचौ बंदर घेण्याखेरीज त्यानें कोणतीच कामगिरी केली नाहीं. अगर आपलें लष्करी किंवा आरमारी बल खर्च केले नाहीं. महायुद्धामुळें जपानला आर्थिक फायदा मात्र अतिशय झाला. पूर्वेकडील विशेषतः हिंदुस्थानांतील बहुतेक व्यापार जपानच्या ताब्यांत गेला.

तथापि जपाननें यूरोपीयांचें अनुकरण करून आपलें शास्त्रीय ज्ञान व लष्करी सामर्थ्य बरेंच वाढविलें आहे यांत मात्र संशय नाहीं. तसेंच यूरोपीयांचें अनुकरण करतांना जपानला सर्व यूरोपीय राष्ट्रें सारखींच असल्यामुळें त्यानें ज्या ज्या बाबतींत जीं राष्ट्रें उत्तम असतील त्या त्या बाबतींत त्या राष्ट्रांचें अनुकरण करून यूरोपीय संस्कृतीतील शक्य तितक्या उत्तम गोष्टी आपल्या देशांत आणिलेल्या आहेत.

इंग्लंडशीं पूर्वीं झालेल्या दोस्तीच्या तहाची मुदत संपल्यानंतर तो तह पुढे चालू ठेवण्याची उत्सुकता जपाननेंच दाखविली नाही.

जपान देश लहान असल्यामुळें त्याला आपल्या वाढत्या लोकसंख्येस व भरभराटीस वाव मिळण्याकरितां आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याची जरूरी वाटूं लागेलच व ही ''भौगोलिक परिस्थिति'' पुढें मागें जपानला दुस-या एखाद्या राष्ट्रांशीं झगडावयास लावील. चीन हल्ली हळू हळू जागा होऊं लागला आहे. तेव्हां जपानला यापुढें चीनमध्यें फारसे हातपाय पसरतां येणार नाहींत. अर्थात् जपानची दृष्टि जवळच्याच पासिफिक महासागरांतील व हिंदी महासागरांतील बेटांकडे प्रथम वळेल व त्यामुळें फ्रान्स अगर ब्रिटन यांपैकीं एखाद्या राष्ट्राशीं पुढें मागें खटका उडेल. त्यांतल्या त्यात ब्रिटिश साम्राज्याच्या अवाढव्य प्रसारामुळें व त्यांतील वसाहतींच्या स्वतंत्र होणाच्या प्रवृत्तीमुळे ब्रिटनशींच विरोध येणें अधिक संभवनीय दिसतें. तथापि जपान हा प्रसंग शक्य तितका दूर लोटण्याचा प्रयत्न करील.

त्याप्रमाणेंच व्यापारी बाबतींत जपानच्या पुढें मागें अमेरिका किंवा ब्रिटन या राष्ट्रांशीं खटका उडण्याचा संभव आहे. सध्यां ही दोन्ही राष्ट्रें आपल्या व्यापाराचें संरक्षण करण्याच्या खटपटीस जोरानें लागली आहेत.