प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
नवे शास्त्रीय शोध.- नव्या नव्या शास्त्रीय शोधांचा व्यावहारिक गोष्टीकडे उपयोग करण्याचें काम एक शतकभर झपाट्यानें चालू होतें. तथापि १८७० च्या फ्रँको जर्मन युद्धापर्यंत या एकंदर शास्त्रीय शोधांचा परिणाम अखिल जगांतील राजकीय परिस्थितीत मोठा महत्वाचा फरक उत्पन्न करण्याइतका झाला नव्हता. या शास्त्रीय शोधांमुळें हल्ली असा परिणाम झाला आहे कीं, माणसांनां फार जलद दूरवर प्रवास करितां येतो; लहानमोठ्या वस्तू दूरवर जलद पाठवितां येतात; तसेंच हरएक कल्पनांचा दूरवर फैलावहि जलद करतां येतो. अर्थोत्पादक संस्थांची आणि राजकीय संस्थांची संघटना विशेष निराळ्या पद्धतीननें आणि ब-याच निर्दोषीपणानें करणें शक्य झालें आहे. या परिस्थितीमुळें राजनीतिशास्त्राच्या नव्या कल्पना पुढें येत असून त्यांची लॉकच्या आणि फ्रेंच राज्यक्रांतिकारकांच्या जुन्या व्यक्तिस्वातंत्र्यप्रधान कल्पनांशीं स्पर्धा चालू आहे. या नव्या कल्पना डार्विननें जगास परिचित करून दिलेल्या विकासवाद या शब्दानें दर्शविल्या जातात. राष्ट्र राष्ट्रांमध्यें चालू असलेला जीवनार्थ कलह सर्व जग व्यापून राहिला आहे. आणि तो उत्तरोत्तर अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. त्यामुळें प्रत्येक राष्ट्रांत स्वतःच्या अंगीं सर्वांगीण कार्यक्षमता पाहिजे ही कल्पना अधिकाधिक जोरानें पुढें येत आहे. या कार्यक्षमतेच्या कल्पनेबरोबर कोणत्याना कोणत्या तरी स्वरूपांत समाजसत्तावाद डोके वर काढीत आहे. यामुळें सांप्रतच्या तीन बलाढ्य राष्ट्रांपुढें म्हणजे ब्रिटन, फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्स यांच्यापुढें वैयक्तिक स्वातंत्र्याचा नाश होऊं न देतां कार्यक्षमता अंगी कशी आणावी हा फार महत्वाचा प्रश्न आहे.
मागील इतिहासाचें सिंहावलोकन करून चालू असलेल्या विसाव्या शतकांत राजकीय क्षेत्रांत कोणत्या घडामोडी होतील यांचा साधारणपणें अंदाज सांगणे सोपें नाहीं, पण प्रवृत्ति सांगतां येईल.