प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
चीन.- याप्रमाणें जगांतील प्रमुख राष्ट्रांच्या प्रवृत्तीचा अंदाज करतां येतो. परंतु चाळीस कोट लोकवस्ती असेलल्या अवाढव्य चीनच्या राष्ट्राची पुढें स्थिति काय होणार हें कोडें मात्र मुळींच उलगडतां येत नाहीं. या अजगर राष्ट्राची कुंभकर्णी झोंप जरी सध्यां मोडलेली दिसते तरी अजून ते डोळे चोळून फारसें हालचाल करूं लागले नाहीं. तेव्हां या राष्ट्रांच्या भवितव्यतेबद्दलहि मत देणें आज अकालींच होईल.
तथापि आतां तेथें पूर्वींची राज्यपद्धति बदलून लोकशाही स्थापना झाली आहे अनेक चिनी विद्यार्थी परदेशांत जाऊन शास्त्रें कला वगैरेचा अभ्यास करून येऊन आपल्या देशाची सुधारणा करण्याची खटपट करीत आहेत. त्यांच्या देशांत विद्वत्तेला पूर्वींपासूनच फार मान देण्याची वहिवाट आहे. ज्ञानकोश, गॅझेटिअर यांसारखे ग्रंथ चीनमध्यें फार पूर्वींपासून तयार करण्याची पद्धति आहे. तेथील राज्य कारभारांत पदवीधरांचाच फक्त प्रवेश होत असे. तेथें पूर्वींच्या परंपरेंत सुधारणा करण्याची खटपट जोरानें चालू आहे व पुराणमताचा लोप होत आहे. यामुळें पाश्चात्त्य विद्येचा प्रसारहि चीनमध्यें सौकर्यानें होईल. याप्रमाणें हें अवाढव्य राष्ट्र जर नवविचारांनीं प्रेरित होऊन जागृत होईल तर त्यामध्यें फार मोठ्या महत्त्वाकांक्षेचा उदय होऊन आपल्या असंख्य लोकसंख्येनें सर्व जग व्यापून जागतिक साम्राज्य स्थापण्याच्याहि गोष्टी कदाचित चिनी लोक बोलूं लागतील. पण या सर्व गोष्टी भवितव्यतेच्या उदरांत लपून बसलेल्या आहेत. त्यांविषयी आज निश्चित तर्क कांहीं करतां येत नाहीं. पण या पीत बागुलबोवाचें भय कांहीं यूरोपीय ग्रंथकारांस आज अर्धशतक वाटत आहे.