प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
ऐतिहासिक काळ - ज्या काळासंबंधीची माहिती शिलालेख, ताम्रपट, नाणीं वगैरे कोणत्याहि प्रकारांनीं लेखनिविष्ट केलेली मिळते तेव्हांपासून ऐतिहासिक काल सुरू होतो. त्याच्या पूर्वींचा म्हणजे प्रथम व द्वितीय पाषाणयुगाचा काल अलीकडील ऐतिहासिक कालाच्या मानानें फारच मोठा आहे. जेव्हांपासून धातूंचा उपयोग व लेखनकलेची सुरूवात होऊन ऐतिहासिक काळास आरंभ होतो त्या प्रकारची परिस्थिति प्रथम ज्या ठिकाणीं आशिया, यूरोप व आफ्रिका हीं तीन खंडें एकमेकांला जोडलेलीं आहेत त्या प्रदेशंत प्रथम उत्पन्न झाली असावी असें कांहीं पंडितांनीं अनुमान काढालें आहे. कृषिकर्म मूळ सुरू होण्यास भौगोलिक दृष्ट्या हाच प्रदेश फार अनुकूल आहे. असें ते म्हणतात. ऐतिहासिक काळाला जेथून सुरूवात होते त्या काळीं आर्थिक व युद्धविषयक परिस्थित्यनुरूप मनुष्यसमाजाचे चार वर्ग होते. त्रिखंडांच्या संयोगभूमीवर हे चारी प्रकारचे लोक एकत्र आलेले आढळतात. हा मध्यवर्ती प्रदेश भूमध्य, काळा, कास्पियन, तांबडा, इराणी, या पांच समुद्रांनीं वेष्टिलेला आहे. या प्रदेशाला नाइल, तैग्रिस व युफ्रेटिस या नद्यांचें पाणी मिळतें, व या नद्यांनां पावसाचें व अबिसीनियांतील आणि आर्मिनियांतील पर्वतांवरील बर्फाचें पाणी मिळतें. तीन खंडांनां जोडणारे प्राचीन हमरस्ते याच प्रदेशांतून जातात. अशी अनेक प्रकारें अनुकूल परिस्थिति याच प्रदेशांत असल्यामुळें मानवजात रानटी स्थितींतून निघून सुधारणेस आरंभ प्रथम येथेच झाला असला पाहिजे असें उपर्युक्त पंडितांचें मत आहे. कारण ते म्हणतात कीं या ठिकाणीं शेतकी करणारे, दर्यावर्दीपणा करणारे, घोडे पाळणारे व उंट पाहणारे असे चार प्रकारचे लोक एकत्र मिळाले होते. आद्य मानवोत्पत्ति व आद्यसंस्कृतिविकास यांचा सविस्तर चर्चा ज्ञानकोश तिसरा विभाग यांत केली आहे.
मोझेसचा ग्रंथ व हिब्रू लोकांचे कायदेग्रंथ यावरून या आद्य ऐतिहासिक काळांतील परिस्थितीवर प्रकाश पडण्यास मदत होते. या ग्रंथांवरून असें दिसतें कीं या आद्य काळांत सुधारणेचीं दोन केंद्रस्थानें होतीं. एक ग्रीक बेटें व ग्रीक द्वीपकल्प व त्यांतलें विशेषतः क्रीटबेट, व दुसरें इजिप्त व मेसापोटेमिया पैकीं क्रीटबेटामध्यें आरंभीं जे व्यावहारिक व ललितकलांचें ज्ञान होतें तोच पुढील ग्रीक लोकांच्या संस्कृतीचा मूळ पाया होत. इकडे इजिप्त व मेसापोटेमिया या देशांत प्रथम थीब्स व निनिव्हि आणि नंतर मेम्फिस व बाबिलोन ही ठिकाणें प्रमुखत्व पावलीं असून तेथील शेतकीचे कालवे वगैरे गोष्टीवरून त्यांची आर्थिक उन्नति अधिक झालेली होती असें दिसतें; व तेथील समाज अर्थातच कायदेकानू व शांतता या बाबतींत अधिक पुढारलेला होता.
नाइल व युफ्रेटिस या नद्यांच्या कांठचे प्रदेश परस्परांस जोडणारा रस्ता अरबस्तानचा उत्तरभाग व सिरिया या देशांतून जात असे. या रस्त्याच्या आसपास वालुकामय प्रदेशांतील टाडमोर, दमास्कस वगैरे सुप्रसिद्ध ओलवणीचीं स्थळें आहेत. याच प्रदेशांतल्या डोंगराळ भागांत हिब्रू लोक आणि समुद्रकांठच्या शहरांत फिनिशियन राहात होते. पेलस्जियन लोकांचा व्यवहारसंबंध इजिप्शियन व फिनिशियन या दोन्ही राष्ट्रांबरोबर असे. त्यामुळें व्यापार व राजकारण या दोन्ही दृष्टींनीं सुधारलेले अनेक मानववंश या ठिकाणीं एकत्र दिसतात. त्या लोकांनींच निदान पश्चिम भागापुरत्या तरी येथें लेखनकला व सोनें, ब्राँझ, व लोखंड यांचें धातुकाम या कला प्रथम शोधून काढल्या असाव्यात. कारण हिंदुस्थानांत लेखनकलेचा उदय व विकास याच सुमारास किंबहुना याहूनहि पूर्वीं झालेला दिसतो व लोखंडाचें धातुकामहि तेथें ब-याच प्राचीन काळापासून चालू असलेलें आढळतें. तत्वज्ञानाच्या प्रांतांत अरब व हिब्रू या सेमेटिक वंशाच्या लोकांनीं एकेश्वरी मताची आग्रहानें स्थापना केली. मिसरी व बाबिलोनी लोकांतील कलाकौशल्य व कायदेकानू घेऊन व त्याला एकेश्वरी उपासनेची जोड देऊन एका नव्या संस्कृतीचा लोकसमाज तयार करण्याचें महत्वाचें काम मोझेसनें (ख्रि. पू. १५७१-१४५१) केलें असावें असें वाटतें.