प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

आधुनिक रशियांची, कामगिरी.- या सुमारास यूरोपच्या पूर्व भागांत रशिया हे राष्ट्र उदयास आले. हें राष्ट्रस्लाव्ह वंशी व आर्यन् भाषा बोलणारें असून, इंग्लंड व फ्रान्स या देशांनां ज्या उत्तरेकडील लोकांनीं (नॉर्समेन) राष्ट्रस्वरूपात पोहोंचविलें त्यांच्याच वंशांतील लोकांनीं रशियांत नवजीवन घातलें. परंतु हें रशियाचे राष्ट्र लेटिन वंशी ख्रिस्ती समाजाशी विरोध करावयास सिद्ध झालें. कारण त्याला ख्रिस्ती संप्रदायाची दीक्षा कान्स्टंटिनोपल येथून मिळाली होती. मध्य युगाच्या उत्तरार्धात मोंगोलियांतील घोडेस्वारवृत्तीच्या लष्करी बाण्याच्या लोकांनीं स्वारी करून रशिया जिंकून घेतला त्यामुळें रशियाचा प्रगतीचा मार्ग कांहीं काळ बंद पडला. पण याच काळांत यूरोपच्या पश्चिमेकडील कांहीं देश सुसंघटित राष्ट्रस्वरूप पावून चांगलें बालष्ठ बनले. वरील स्वारीनंतर दोन शतकांनीं रशियानें मोंगोलियन लोकांची सत्ता झुगारून देऊन स्वतःस स्वतंत्र केले. आणि तुर्कांनीं कान्स्टंटिनोपल घेतल्यामुळें निराधार बनलेल्या पूर्व यूरोपांतील ख्रिस्तसंप्रदायी समाजचें पुढारीपण स्वतःकडे घेतले. पीटर दी ग्रेटनें बहुतेक अंशीं आशियाखंडांत सुलतानशाही एकतंत्री सत्ता चालवून रशिया देशाची झटपट सुधारणा करून त्याला यूरोपांतील प्रमुख राष्ट्रांच्या पंक्तींत आणून बसविले. अगदीं अलीकडे जपाननें जो मार्ग स्वीकारला त्याचें पीटर दी ग्रेटच्या अमलाखालचा रशिया हें तंतोतंत सर्वगामी उदाहरण होय. रशियाच्या या आकस्मिक स्थित्यंतरामुळें मध्ययूरोपची राजकीय परिस्थिति एकदम आमलाग्र बदलली. आणि त्यामुळें १७ व्या शतकाच्या अखेरीपासून १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत यूरोपांत जीं अनेक मोठालीं युद्धें झालीं त्या वेळच्या यूरोपीय राष्ट्रांमधील परस्पर शत्रुमित्रत्वाच्या नात्यामध्यें रशियाचा हात वावरूं लागल्यापासून फार अस्थिरता चालू राहिली. इकडे पश्चिम यूरोपमध्यें आणि समुद्रावर इंग्लंड व फ्रान्स यांच्यामधील शत्रुत्व सारखें चालू होतें, तर तिकडे यूरोपखंडांतील इतर भागांत रशिया सारखी ढवळाढवळ करून अनेक देशांतील मुत्सद्यांचे बेत व आडाखे फिसकटून टाकीत होता. याच काळांत प्रशियांतील एका मागून एक पुढें आलेल्या अनेक मोठ्या कर्तृत्ववान पुढारी इसमांनीं मध्यस्थाची भूमिका स्वीकारून मोठ्या धूर्तपणानें प्रॉटेस्टंटपंथी उत्तर जर्मनींत प्रशियाचें वर्चस्व प्रस्थापित केलें. सप्तवार्षिक युद्धामध्यें इंग्लंडनें ऑस्ट्रियाची दोस्ती सोडून देऊन प्रशियाच्या फ्रेडरिक दी ग्रेटचा पक्ष उचलला. पण पुढें इंग्लंडनें फ्रेडरिकची बाजू सोडून दिली. आणि त्याबद्दल सूड उगविण्याकरितां म्हणून २० वर्षांनंतर इंग्लंडबरोबर स्वातंत्र्याकरितां केलेल्या झगड्यांत युनायटेड स्टेट्सचें सहाय्य करण्यास फ्रेडरिकनें फ्रान्सला मोकळीक दिली.