प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

इंग्लंडांतील औद्योगिक क्रांति.- जगाची आजची परिस्थिति हा पुष्कळ अंशीं जी औद्योगिक क्रांति इंग्लंडमध्यें १८ व्या शतकांत घडून आली तिचा परिणाम आहे. ही औद्योगिक क्रांति तत्पूर्वकालीन व्यापारविषयक परिस्थितीचा आणि नव्या शास्त्रीय संशोधनाचा परिणाम होय. शास्त्रीय संशोधन आणि वाढता व्यापार हे प्रॉटेस्टंट धर्मपंथाचा उदय आणि अमेरिका, आस्ट्रेलिया इत्यादि नव्या जगाचा शोध यांचे परिणाम आहेत. इंग्लंडमध्यें आल्फ्रेड राजानें डेन्स लोकांविरुद्ध केलेल्या झगड्यामुळें नॉर्मन लोकांचा पुढारी वुइल्यम दी काँकरर यानें इंग्लंडदेश जिंकल्यामुळें आणि पुढें इंग्लंडनें फ्रान्सबरोबर केलेल्या शतवार्षिक युद्धामुळें राष्ट्रीयत्वाची भावना बलवत्तर वाढलेली असली तरी इंग्लंडदेश यूरोपखंडापासून अलग, जलवेष्ठित असल्यामुळें इंग्लंड लष्करी बाण्यापासून विमुक्त स्थितींत आहे. तथापि यूरोपखंडामध्यें विचारांच्या व आचारांच्या ज्या मोठाल्या विस्तृत लाटा उसळत असत त्यांत इंग्लंड अंशभागी झाल्यावाचून रहात नसे. ही गोष्ट लक्षांत ठेविली म्हणजे असें दिसून येईल कीं यूरोपमध्यें युद्धांचा धुमधडाका चालून त्याची खराबी चालू असतां तिकडे इंग्लंड धर्माचे बाबतींत प्रॉटेस्टंटपंथीं आणि राज्यकारभाराचे बाबतींत लोकनियुक्त बनला. तसेंच नव्या नव्या शास्त्रीय शोधांच्या आधारावर उद्योगधंद्यांच्या आणि व्यापाराच्या बाबतींत जो पुढारी बनला तो केवळ दैवयोग म्हणतां येणार नाहीं.