प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
आधुनिक काळास आरंभ.- १५ व्या शतकांत मध्ययुगीन परिस्थिति मागें पडून नव्या नव्या कल्पनांचा हळू हळू उदय होऊं लागल्यामुळें यूरोपीय समाजांत एक प्रकारची चलबिचल उडालेली होती. या सुमारास परस्परसंबद्ध अशा कित्येक फार महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. १२०४ पासून ख्रिस्ती धर्मवीर (क्रूंसेडर्स) व इस्लामी धर्मवीर यांच्यामध्यें अनेक निकराचे सामने होऊन अखेर १४५३ मध्यें कांस्टंटिनोपल शहर मुसुलमानांच्या हातीं पडलें, आणि यूरोपमध्यें तुर्क लोक बळावत गेले. या गोष्टीचा प्रतिक्रियात्मक परिणाम असा झाली कीं, उत्तरेकडे व्हिएन्ना येथें हॅप्सबर्ग नांवाच्या जर्मनवंशी राजघराण्यानें आपली सत्ता अधिकाधिक सुसंघटित व दृढ केली. पोपच्या सत्तेला विरोध करणारे रोमन-जर्मन साम्राज्य १२५० मध्यें लयास गेलें. व त्याच्या पाठोपाठ व्हिएन्ना येथें हेंप्सबर्ग घराण्याचें साम्राज्य उदय पावून पोपसत्तेला व ख्रिस्ती समाजाला आधारभूत बनलें. कास्टंटिनोपल शहर तुर्कांच्या हातीं पडल्याचा दुसरा एक मोठा अनपेक्षित परिणाम झाला. तो असा कीं, छापण्याची कला सुधारून पूर्णत्वाप्रत पोहोंचली होती. अशा सुमारास कन्स्टंटिनोपल येथे संगृहीत होऊन राहिलेलें ग्रीक विद्वज्जनबळ व ग्रीक ग्रंथबळ तेथला तेथला थारा सुटल्यामुळें पश्चिमेच्या बाजूला उदयास येत असलेल्या युनिव्हर्सिट्यांच्या आश्रयास गेलें. अशा रीतीनें या सुमारास, ज्ञानविषयक स्वतंत्र संशोधनाच्या क्षेत्रांत आणि धर्मसत्तेच्या क्षेत्रांत नव्या जोमाची लाट उसळली. पहिल्या म्हणजे ज्ञानक्षेत्रीय लाटेमुळें विद्यापुनरूजीवन (रेनेसन्स) व ख्रिस्ती धर्मसुधारणा (रेफर्मेशन) हे दोन महत्त्वाचे परिणाम पुढें घडून आले. आणि धर्मसत्ताक्षेत्रीय लाटेमुळें कौंटर रेफर्मेशन व हॅप्सबर्ग-बोर्बोन घराण्यांची अनियंत्रित सत्ता हे परिणाम घडून आले.
आधुनिक काळांत जगाच्या इतिहासांत ज्या अत्यंत झपाट्यानें घडामोडी चालू आहेत त्यांच्या मार्गावरील १४९२ हें साल हें एक मोठें महत्त्वाचे ठिकाण आहे. या वर्षीं तीन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट ही कीं फ्रान्सनें इटालीवर स्वारी केली. या स्वारीमुळें मध्ययूरोपांतील राजकीय परिस्थितीला किती दुबळेपणा आलेला होता हे सिद्ध झालें व त्याबरोबरच यूरोपच्या पश्चिमेकडील नवीं राष्ट्रें कशीं बळावत चाललीं होतीं तें प्रत्ययास आलें. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही कीं, स्पेननें ग्रानाडा घेतलें आणि त्या द्वीपकल्पातील इस्लामची सत्ता नष्ट केली व त्याबरोबरच तेथून ज्यू लोकांनां हांकून लाविलें. तिसरी महत्वाची गोष्ट ही कीं, याच सालीं कोलंबसानें अमेरिकाखंड शोधून काढिलें. अमेरिकाखंडाचा शोध ही गोष्ट तत्कालीन अनेक चळवळींचे पर्यवसान होय. कान्स्टंटिनोपल येथून उपलब्ध झालेले अनेक ग्रीक ग्रंथ छापले जाऊन ते वाचनांत आल्यामुळें पृथ्वीवर अनेक दिशांनीं भौगोलिक संशोधन करण्याची कल्पना लोकांच्या डोक्यांत उद्भवली. मूरलोकांबरोबर सुरू झालेल्या झगड्यामुळें पोर्तुगीज व स्पॅनिश लोकांनां आटलांटिक महासागराचा दूरवरचा प्रदेश शोधून काढण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. इटलीमधील शहरांनीं व्यापारविषयक कार्यांत जी जोराची चळवळ केली तिच्यामुळें दर्यावर्दीपणाचें कौशल्य लोकांच्या अंगी वाढत गेलें. समुद्रावर दूरवर सफरी करण्याचा यूरोपांतील लोकांत जो नवा उत्साह दिसूं लागला त्याला नव्या उदयोन्मुख राष्ट्रांच्या परस्पर स्पर्धेमुळें अधिकाधिक उत्तेजन मिळालें. समुद्रावरील दूरदूरच्या सफरींच्या या कार्यक्रमांत प्रामुख्यानें पुढाकार घेणारा जो हेनरी दी नॅव्हीगेटर तो अंशतः इंग्रज वंशांतला व अंशतः पोर्तुगीज वंशांतला होता.