प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
आर्यन लोकांचे विजय.- मोझेसनंतरचा महत्त्वाचा कालविभाग आर्यन लोकांच्या विजयाचा होय. हे आर्यन् लोक मध्य आशियांतून मूळ बाहेर पडले. असा सिद्धांत पुढें आला होता. पण अलिकडील संशोधनामुळें तो कांहीसा डळमळीत झालेला दिसतो. आर्यन लोक मुलूख जिंकीत निघाले, पण त्यांचे निरनिराळें जमाव लहान लहान होते असें दिसतें. तथापि त्यांचा जोम अधिक असल्यामुळें त्यांनी आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली. व पुष्कळ जित लोकांनां स्वतःची भाषा अंगीकारण्यास लाविलें. तथापि ज्याप्रमाणें गॉल व आयबेरियन लोकांमध्यें लॅटिन भाषेचें मूळ स्वरूप बदलून अनेक अपभ्रष्ट भाषा तयार झाल्या त्याचप्रमाणें आर्यन् लोकांच्या मूळ भाषेचें स्वरूप नष्ट होऊन जित लोकांनीं अनेक अपभ्रष्ट भाषा बनविल्या. तथापि आर्यन् लोकांनीं ज्यांनां जिंकलें त्या मूळच्या लोकांच्या रक्तांत व त्यांच्या मूळच्या कलाकौशल्यांत फारसा कांहीं फरक झाला नाही. ग्रीक व इराणी या लोकांच्या उदाहरणांवरून पाहतां हे जेते आर्यन् लोक त्या जितांच्या मानांनें रानटीच होते, व त्यामुळें या जित लोकांची सुधारणाच आर्यन् लोकांनीं पत्करली. ग्रीसमध्यें पेलोस्जियन काळांतील सुधारलेली लोकस्थिति होमरच्या काव्यांतील काळापर्यंत चालून पुढें कांहीं काळ स्तिमित युग पसरलें व नंतर पुनरुज्जीवन होऊन अथेन्स शहर नव्या ग्रीक सुधारणेचें केंद्रस्थान बनलें. इकडे इराणी लोकांनीं मोठें साम्राज्य स्थापिलें पण त्यांची भाषा इराणाबाहेर कोठेंहि पसरली नाहीं.