प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

अशियांतील लोकांचा यूरोपांत प्रवेश.- राजकारणांत रोमनसत्तेनें एक मोठी चूक केली; ती अशी कीं, पूर्व धोरणाला अनुसरून -हाईन व डॅन्यूब ही सरहद्द तिनें कायम केली. बाल्टिक आणि काळासमुद्र यांनां जोडणा-या रेषेपर्यत ती पुढें जाती तर जगाचा सर्वच इतिहास निराळा झाला असता पण हंगेरीचीं गवताळ माळरानें तिनें आपल्या ताब्यांत घेतलीं नाहींत म्हणून जेव्हां अटिलाच्या नेतृत्वाखालीं आशियाच्या घोडेस्वारांनीं पश्चिमेकडे डॅन्यूबपर्यंत मोहीम केली, तेव्हां त्यांनीं हंगेरी ज्याठिकाणीं अँड्रियाटिकच्या माथ्याशीं येते त्याजागीं पूर्व आणि पश्चिम यांची ताडातोड केली. त्याचप्रमाणें त्यांनीं जर्मनांनां त्रास दिला तेव्हां सॅक्सन्स, फ्रँक्स, अल्लेमन्नी, आणि गॉथ असे जर्मनांचे संघ बनून, ते संघ लॅटिन पश्चिम प्रदेश व ब्रिटन या ठिकाणीं गेले. व्हंडालांचा असाच एक संघ अफ्रिकेंत उतरला व त्यानें कार्थेज येथे वस्ती केली.