प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

क्रिमियन युद्ध व फ्रँकोजर्मन युद्ध - तुर्कस्थानच्या लुलेपणामुळें अखेर आस्ट्रिया आणि रशिया यांच्या मनांत एकमेकाला विरोधी अशा लोभमूलक भावना उत्पन्न झाल्या. त्यानंतर जें क्रिमियन युद्ध झालें, तें युद्धच हल्लींच्या जगाच्या राजकीय परिस्थितीची गुरूकिल्ली आहे. क्रिमियन युद्धाचा विशेष टिकाऊ असा कोणताच परिणाम झालेला नाहीं असें कांहींजण म्हणतात पण तें मत चुकीचें आहे. या युद्धांत पश्चिम यूरोपांतील राष्ट्रें दोस्तसंघ बनून रशियाबरोबर लढत असतां आस्ट्रिया तटस्थ राहिला होता, इतकेंच नव्हे तर रशियावर बाजूनें हल्ला होण्याची भीतीहि त्यानें रशियाच्या मनांत उत्पन्न केली होती. या वर्तनाबद्दल आस्ट्रियाला रशियानें क्षमा केली नाही, लवकरच पुढें आस्ट्रियाचा फ्रान्सनें सॉल्फेरिनो येथे, आणि प्रशियानें सडावा येथें पराभव केला व त्यामुळें आस्ट्रियाची जी हीन दशा झाली ती रशिया स्वस्थ मौजेनें पहात राहिला. आस्ट्रियाच्या या पराभवामुळें उत्तरेकडे संयुक्त जर्मन राष्ट्र तयार झालें आणि दक्षिणेकडे इटालीचें संयुक्त राष्ट्र बनलें. सेडन येथें चार्लस दी ग्रेट याच्या साम्राज्याच्या फ्रेंच व जर्मन विभागांची पुन्हां एकदां आदलाबदल झाली. इ. स. १२५० पासून १८७० पर्यंत फ्रान्सनें जर्मनीला दुभंगलेला ठेवून सर्व यूरोपखंडावर आपले वर्चस्व चालविलें होतें. १८७० पासून फ्रान्स कमजोर होऊन यूरोपखंडावर प्रॉटेस्टंट जर्मनीचें वर्चस्व स्थापन झालें. पण हें वर्चस्व मिळविण्याकरितां जर्मनीनें स्वातंत्र्याच्या कल्पना झुगारून देऊन लष्करी बाण्याचा स्वीकार केला. जर्मनीच्या या वृत्तीमुळें जगाच्या परिस्थितींत अस्थिरता चालू ठेवण्यास जर्मनी कारणीभूत झाला आहे.

जर्मनीची मूक वृत्ति पाश्चात्य वळणाची असली तरी राजकारणामध्यें जर्मनीला पौरस्त्य देशांचे धोरण स्वीकारावें लागले आहे.