प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

जर्मनी. - जर्मनी आणि तुर्कस्थान यांची स्थिति विशेष लक्षांत घेण्यासारखी आहे. कारण त्यांच्या विशिष्ट भौगोलिक स्थितीमुळें त्यांनां एकमेकांशीं गठ्ठी राखणें भाग आहे. ऐतिहासिक घडामोडींच्या विशिष्ट ओघामुळें यूरोपच्या उत्तरेपासून आग्नेय कोप-यापर्यंतच्या प्रदेशांत अनेक प्रकारच्या संस्कृतींचे लोक वसलेले आहेत. हॉलंड व उत्तर जर्मनींत प्रॉटेस्टंटपंथी लोक, आस्ट्रियांत कॅथॉलिकपंथी लोक, आस्ट्रियाच्या दक्षिणेकडील प्रदेशांत कट्टे पुराणमताभिमानी ख्रिस्तधर्मी स्लाव्ह लोक, आणि त्याच्याखालीं तुर्कस्थानांत मुसुलमानधर्मी लोक अशी ही मालिका लागली आहे. परंतु एका बाबतींत जर्मनी आणि तुर्कस्थान यांची स्थिति समान आहे. ती बाब ही कीं, हे दोन देश एका बाजूला रशियाची प्राधान्यतः जमिनीवरील लष्करी सत्ता आणि दुस-या बाजूला ब्रिटन व फ्रान्स यांची समुद्रावरील सत्ता यांच्यामध्यें वसलेले आहेत. इंग्लंडनें इजिप्त व्यापल्यामुळें आणि फ्रान्सनें मोरोक्को व्यापल्यामुळें जर्मनी आणि तुर्कस्थान या देशांनां विशिष्ट महत्व प्राप्त झालें आहे. एका बाजूला फ्रान्स आणि दुस-या बाजूला रशिया अशा कचाट्यांत सापडल्यामुळें जर्मनीला स्वतःचें स्वतंत्र अस्तित्व कायम राखण्याकरितां स्वतःचें लष्करी सामर्थ्य बलवान ठेवणें भाग आहे. तुर्कस्थानजवळहि आशियामायनरमधील शेतकरी तुर्की लोकांचे बनलेलें सामर्थ्यवान सैन्य आणि त्याची जलद हालचाल करण्याकरितां लागणारे रेल्वेचे फांटे तयार असल्यामुळें तुर्कस्थानला आपल्या पूर्व सरहद्दीवरील आणि पश्चिम सरहद्दीवरील शेजारी राष्ट्रांनां एकमेकांशीं झुंजत ठेवण्याचें काम दीर्घकाल करीत रहाणें शक्य आहे. नवीन शोधून काढलेल्या अमेरिका, आस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका वगैरे खंडांत नवीन नवीन वसाहती स्थापन करून साम्राज्य वाढविण्याचें जे कार्य कांहीं यूरोपियन राष्ट्रांनीं केले त्या कार्यांत जर्मनी फार उशिरां पडला त्यामुळें त्याला वसाहतीचें साम्राज्य संपादितां आलें नाहीं. अशा स्थितींत जर्मन साम्राज्याला आपली सत्ता चालविण्याला दोन मार्ग होते. आपलें आरमार वाढवून ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्स यांचेबरोबर मन्रो डॉक्ट्रिन संबंधानें सामना करणें हा एक मार्ग; किंवा आपले जमिनीवरील सैन्य वाढवून आपल्या संपत्तीच्या जोरावर तुर्कस्थानच्या मार्फत आपले वजन खर्च करून रशिया आणि पश्चिम यूरोपांतील राष्ट्रें यांच्या परस्पर सत्तेमध्यें समतोलपणा राखण्याचें काम करणें हा दुसरा मार्ग. हीं दोन्ही कामें न साधलीं तर यूरोपच्या मध्यभागीं असलेल्या आपल्या देशांत हॉलंड प्रमाणें खुल्या व्यापाराचें तत्त्व स्वीकारून स्वतःचे उद्योगधंदे अत्यंत मोठ्या प्रमाणांत वाढविणें हाहि एक मार्ग जर्मनीपुढें होता.

त्याप्रमाणें जर्मनीनें आपले उद्योगधंदे व व्यापार सर्व जगावर अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढविले, व आपल्या देशांत उद्योगाच्या आणि ज्ञानप्रसाराच्या अनेक शाखांत इतकी पद्धतशीर सुधारणा केली कीं जर्मनी हें सर्व जगास आदर्शभूत राष्ट्र बनलें. पण जर्मन राष्ट्रांत उत्पन्न झालेल्या साम्राज्याविषयींच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळें व त्याच्या पाणबुड्यांच्या धुमाकुळामुळें महायुद्धाच्या वणव्यांत त्यास पडावें लागलें व त्यामुळें त्यानें जगांतील बहुतेक राष्ट्रांची सहानुभूति गमावली. व अखेरीस अमेरिकेलाहि आपली तटस्थ वृत्ति बाजूस ठेवून लढाईच्या आखाड्यांत उतरावें लागलें, त्यामुळें अखेरीस जर्मनीचा पराभव होऊन त्याची अत्यंत हलाखीची स्थिति झाली. तेथील प्रख्यात होहेनझोलर्न घराणें व त्याबरोबरच कैसरची साम्राज्यस्वप्नें सर्व लयास गेलीं; व क्षणभर जर्मनीहि खाका वर करून बोल्शेविक होतो काय अशी सर्व यूरोपास भीति वाटत होती. पण सध्यां तेथें एक लोकसत्ताक राज्य स्थापन झालें आहे पण फ्रान्सनें रूहरमध्यें लावलेल्या गळफांसामुळें त्याचेंहि आयुष्य किती काळ टिकेल याबद्दल संशय वाटूं लागला आहे. सध्यां जर्मन राष्ट्र आजचा दिवस जाऊन उद्याचा कसा निभेल या फिकिरींतच असल्यामुळें त्याच्या भवितव्यत्तेविषयीं काहींच अनुमान काढतां येत नाहीं.

इंग्लंडनें जर्मनीवर लादलेल्या कर्जाच्या अटी थोड्या कमी करण्याविषयीं सहानुभूति दाखविली आहे.