प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
फ्रँक लोकांचा उत्कर्ष - लॅटिन रोमवर हल्ला करणा-या ट्यूटॉन्समध्यें फ्रँक्स हे पहिल्या प्रतीचे म्हणतां येतील. इकडे गॉथ व व्हंडाल लोक कांहीं काळ पूर्वेकडे राहिले व तेथून पाखंडी ख्रिस्तीसंप्रदायाची दीक्षा घेऊन परत आले; तिकडे ब्रिटनमध्यें सॅक्सन्सनां परकीय धर्मप्रचारकांनीं ख्रिस्ती केलें; पण फ्रँकलोक लोक पुढें -हाईन नदी ओलाडतांना असद्धर्मी होते व पुढें त्यांनां त्यांच्या जित प्रजेकडून ख्रिस्ती दीक्षा मिळाली. आणखी, फ्रँक लोकांनीं इतर ट्यूटॉन प्रमाणें आपलें जर्मनमूळ सोडलें नाहीं व याचा फायदा असा झाला कीं लॅटिन प्रांतांतील ट्यूटॉनिक जोर कमी झाला तेव्हां -हाईनच्या पलीकडून यांनीं त्यांनां मदत पाठविली. तेव्हां फ्रँक हे लॅटिनाविषयीं कळकळ बाळगणारे व त्यांनां बल पुरविणारे होते यांत संशय नाहीं. या दोघांनां एकत्रित करून एक बलाढ्य राष्ट्र निर्माण करण्याला दोघांनांहि परकीय अशा लोकांच्या स्वारीची भीति मात्र हवी होती. त्याप्रमाणें अशी स्वारी दोन वेळां झाली. पहिली मर्व्हिंग घराण्याच्या अमदानींतली असून, त्यावेळीं हूणांचा चालॉन्स येथे पराभव करण्यांत आला व दुसरी कारोलिंगीयन कारकीर्दींतील असून, तेव्हां सॅरासेनांचा टूर्स येथें पराभव झाला. टूर्सच्या लढाईनंतर दोन पिढ्यांनीं, म्हणजे ज्यावेळीं फ्रँकने इटलीतील पाखंडी लाँबर्ड लोकांनां जिंकून व उत्तरजर्मनीतील सॅक्सनांनां ख्रिस्ती धर्मांत ओढून आपलें बल व धर्मश्रद्धा सिद्ध करून दिली, तेव्हां रोमचा सर्वांत वडील मुलगा म्हणून त्याला गणण्यांत आले. इ. स. ८०० मध्यें पोपने फ्रँक राजा जो चार्लस दि ग्रेट याला रोमन बादशाही तक्तावर अभिषेक केला.