प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
नेपालियन - नेपोलियनच्या नेतृत्वाखालीं फ्रान्सनें आपला दुहेरी झगडा चालू ठेवला; समुद्रावर इंग्लंडबरोबर आणि जमीनीवर फ्रान्सच्या पूर्वेकडील राष्ट्रांबरोबर. नेपोलियनला फ्रान्सची सत्ता वाढविण्याची संधि आस्ट्रिया आणि प्रशिया यांच्यामधील अपरिहार्य राजकीय स्पर्धेमुळें मिळाली. त्यानें पृथकपणें आस्ट्रियाच्या सत्तेचा आस्टर्लीझच्या रणभूमीवर आणि प्रशियाच्या सत्तेचा जेनाच्या रणभूमीवर मोड केला. परंतु या दोन राष्ट्राबरोबरच्या सामन्यांत नेपोलियनच्या विरूद्ध पंक्षांत जेव्हां रशियाची भर पडली तेव्हां एकंदर सामना नेपोलियनला डोईजड होऊन त्यांत अखेर पूर्णपणें त्याच्या अंगावर बाजू आली.
नेपोलियनोत्तराची पन्नास वर्षें.- नेपोलियनबरोबर बरच्या युद्धाचा शेवट झाला त्या वेळीं दोन राष्ट्रें यूरोपांत सर्वाहून बलिष्ठ बनलेलीं होती. एक रशियाचें राष्ट्र व दुसरें ब्रिटनचें राष्ट्र. या युद्धानंतर तह ठरविण्याकरितां जी प्रथमच काँग्रेस भरली तिच्यांत नवे दोस्त-राष्ट्र-संघ स्पष्टाणें दिसूं लागले. फ्रान्स इंग्लंडच्या पक्षाला वळला, आणि आस्ट्रिया व प्रशिया रशियाच्या कक्षेखालीं शिरले. यानंतर अर्धें शतक प्रशिया अगदीं असहाय स्थितींत पडून राहिला. कारण शियानें आस्ट्रियाचा पूर्णपणे पाठीराखेपणा चालविला होता. पूर्व, मध्य आणि दक्षिण यूरोपच्या सर्व भागांत अनियंत्रित लष्करी सत्तेचें आणि धर्मसत्तेचे वर्चस्व चालू राहिलें. या अवधींत पश्चिम यूरोपांतील दोन वरिष्ठ राष्ट्रांमध्यें आणखी का नव्या बलिष्ठ राष्ट्राची भर पडली. ज्याला ब्रिटन मातृस्थानीं होतें आणि ज्याला फ्रान्स स्वातंत्र्यदातृस्थानीं होतें असें नवें युनायटेड स्टेट्सचें राष्ट्र सामर्थ्याप्रत व उत्कर्षाप्रत वाढत होतें. दक्षिण अमेरिकेंतील देश स्पेन व पोर्तुगाल यांच्या साम्राज्यासत्तेविरूद्ध बंड करून स्वतंत्र होत होते; आणि कॅनिंग नांवाच्या इंग्रजानें शोधून काढलेलें (मनरोडॉक्ट्रिन) तटस्थ वृत्तीचें धोरण युनायटेड स्टेट्सनें अंगिकारलें होतें. फ्रान्स इंग्लंडबरोबर सख्य राखून भूमध्यसमुद्रापलीकडे आफ्रिकाखंडातील प्रदेशांत आपली साम्राज्यसत्ता स्थापन करण्याच्या कार्यांत गुंतला होता.