प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
फ्रान्स - फ्रान्सला उत्तरोत्तर ब्रिटन व अमेरिका यांनां चिकटून रहाणें अवश्य आहे. गेल्या महायुद्धांत फ्रान्सचे जीवित ब्रिटन व अमेरिका यांच्या मदतीवरच अवलंबून होतें. तसेच समुद्रापलीकडे दूर देशीं फ्रान्सचा जो साम्राज्यांतर्गत मुलूख आहे तो मुलूख म्हणजे बलिष्ठ आरमारी सामर्थ्य असलेल्या राष्ट्रांच्या हातीं दिलेले एक प्रकारचे ओलीसच आहेत. अशा प्रकारे यूरोपांतील इतर कोणत्याहि राष्ट्रापेक्षां फ्रान्सचा हात प्रबल आरमारी सत्तावान् राष्ट्रांच्या जबड्यांत अधिक सांपडलेला आहे. आहे ही स्थिति जगाच्या फायद्याचीच आहे असे म्हणतां येईल. कारण त्याच्या योगानें जगांतील स्वतंत्र असलेल्या भागांत अँग्लो सॅक्सनी धोरणाचा जो पगडा बसला आहे त्याला आंत शिरून अर्गलारूपी होण्याकरितां जरूर असलेलें लॅटिन संस्कृतीचे धोरण चालू राहील अशी आशा आहे.
सध्यां यूरोपीय राजकारणांत फ्रान्सला जरी बरेंच महत्त्व प्राप्त झालें आहे व जर्मनी जरी महायुद्धाच्या भारामुळें चिरडून गेला आहे. तरी जर्मनीचें सान्निध्य फ्रान्सला केव्हांहि विश्रांति घेऊं देणार नाहीं. फ्रान्सचें नांव जरी महायुद्धांतील विजयी राष्ट्रांच्या यादींत दिसलें तरी आर्थिक बाबतींत फ्रान्सची स्थिति बरीच खालावलेली आहे, व फ्रान्सचा मुलुखहि गेल्या महायुद्धांत बराच उध्वस्त झाला आहे. तेव्हां फ्रान्सला आर्थिक व लष्करी बाबतींत पूर्वस्थितीवर येण्यासच बरेच दिवस लागतील, व तोंपर्यंत व त्यानंतरहि फ्रान्स बरींच वर्षें दोस्त राष्ट्रांस व विशेषतः इंग्लंड व अमेरिका यांस चिकटून राहील.