प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
प्रागैतिहासिक काळ - या काळांतील माणसांच्या इच्छा व आकांक्षा काय प्रकारच्या होत्या याची माहिती फार अल्प मिळते. त्यांनीं बोलण्याची भाषा बनविली होती हें बरेंच शक्य दिसतें. मात्र त्या भाषेंत चार दोनशेंहून अधिक शब्द खास नसावेंत. पाषाणयुगांतील माणसांनां हाडांवरून कोरून प्राण्यांचीं व शिकारीचीं वगैरे चित्रें काढतां येत होतीं. व पाषाणांची घांसून व्यवस्थित आकाराची हत्यारें करतां येत होतीं. तसेंच 'स्टोनहेंज' उभ्या केलेल्या दगडांचे वर्तुळ या इंग्लंडमधील अवशेषांसारख्या कित्येक गोष्टींवरून त्या प्रागैतिहासिककालीन लोकांच्या कांहीं धार्मिक समजुती असाव्या असेंहि वाटतें.