प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

तुर्कस्तान व मुसुलमानी राष्ट्रें.- यूरोपखंडामध्यें खलीफांनीं विजय मिळवून एका काळीं आपली सत्ता व्हिएन्ना व स्पेनपर्यंत पसरली होती. परंतु पुढें मुसुलमानांचें सामर्थ्य कमी होत जाऊन त्यांस हळू हळू पाय मागें घ्यावा लागला. पुढें यूरोपांत जेव्हां राष्ट्रीय भावनांची व स्वातंत्र्याच्या लालसेची वाढ होत गेली त्या वेळीं तुर्कांच्या सत्तेखालचा एक एक प्रांत स्वतंत्र होऊं लागला. तुर्कांची यूरोपाबाहेर हकालपट्टी होण्याची वेळ क्रिमियन युद्धाच्या वेळीं आली होती. पण यूरोपियन राष्ट्रांतील परोत्कर्षासहिष्णुतेमुळें व इंग्लंडला रशिया प्रबळ झाल्यास आपल्या हिंदुस्थानांतील साम्राज्यास धक्का बसेल अशी भीति उत्पन्न झाल्यामुळें त्या वेळीं इंग्लंड व फ्रान्स हीं तुर्कांच्या बाजूनें रशियाच्या विरूद्ध लढलीं व तुर्कांचें यूरोपखंडांत अस्तित्व कायम राहिलें. त्यानंतर तशाच प्रकारचा दुसरा प्रसंग परवाच्या महायुद्धांत आला होता. पण या वेळीं तुर्कांनीं आपलें यूरोपातील राज्य आपल्या चिकाटीनें व आपल्या तलवारीच्या जोरावरच कायम राखलें. तुर्की राष्ट्रानें पुराणपरंपरेची शृंखला तोडून टाकून खलीफाची राजकीय सत्ता काढून घेऊन ती लोकायत्त केली आहे; यूरोपांत होणा-या शास्त्रीय प्रगतीचा पूर्ण उपयोग करून घेण्याचा उद्योग आरंभिला आहे व तरूण तुर्कांनीं नवीन त-हेच्या संस्था व विचार याचा अवलंब चालविला आहे. गेल्या महायुद्धानंतर ग्रीसशीं चाललेल्या पुरवणीयुद्धांत तुर्की तलवारीस यश मिळण्याचें मुख्य कारण तिला मिळालेलें जर्मन पाणी होय ही गोष्ट तज्ज्ञांच्या नजरेस आल्यावांचून राहिली नसेल. आतां नुकत्याच झालेल्या लॉसेन येथील तहानें तुर्की प्रश्नांचा तात्पुरता तरी निकाल लागला आहे. आतां तुर्कांस आपलें अस्तित्व आपल्या लष्करी सामर्थ्यावर अवलंबून आहे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

तेव्हां यापुढील तुर्कांचें कार्य म्हणजे प्रथम आपल्या प्रांतांत स्थिरस्थावर करून आपलें बल वाढवावयाचे हे होय. हें बल तुर्कांस स्वतःचें सामर्थ्य वाढवून व इतर मुसुलमान राष्ट्रांची सहानुभूति मिळवून वाढवितां येईल. अर्थात् तुर्क लोक इजिप्त, इराण, अफगाणिस्तान इत्यादि मुसुलमान राष्ट्रांस व हिंदुस्थानांतील मुसुलमानी जनतेसहि आपणाशीं संबंद्ध करूं पाहतील व त्यांच्या जयिष्णु पारमार्थिक संप्रदायाच्या बंधनानें बद्ध झालेलीं हीं राष्ट्रें व लोक पुढें मागें तुर्कांचें साहाय्य करण्यास उद्युक्त झाल्यास त्यांत आश्चर्य वाटण्याचें कारण नाहीं. मेसापोटेमियांतील शेख महादि व त्याचे दोन पुत्र इंग्रजसरकारनें हद्दपार केल्यामुळें इराणी लोक चिडून निषेध प्रदर्शित करतात व ब्रिटिश मालावर बहिष्कार घालतात यांतील मर्महि हेच आहे. अफगाणिस्तान सरकारास स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून मान देऊन व त्यास लंडनमध्यें वकील ठेवण्याची परवानगी देऊन त्यास गौरवून आपल्या पक्षास चिकटवून ठेवण्याचा ब्रिटिशानीं कितीहि प्रयत्न केला तरी त्यांच्यांतील आजपर्यंत अनेक वेळां प्रचीतीस आलेलें धर्मवेड पुढें मागें त्यांस इतर महंमदी राष्ट्रांकडेच ओढ घ्यावयास लावील व पुढें जर इस्लामी विरुद्ध ख्रिस्ती किंवा बौद्ध संस्कृतीचा सामना व्हावयाची वेळ आली तर त्याचा परिणाम काय होईल याचें अनुमान आज करणें बरेंच धाष्ट्र्याचें होईल.

उलट पक्षीं हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे कीं मुसलमानांमध्यें द्वेंत उत्पन्न झालें आहे आणि बराचसा महंमदी भाग परकी राज्याखालीं असल्यामुळें चांगलें किंवा वाईट करण्यास असमर्थ आहे. हिजाजचा शरीफ स्वतंत्र राजा झाल्यामुळें मक्केवरील अधिकारामुळें सुलतानास जें प्रामुख्य होतें तेंहि आज गेलें आहे. मध्यआशियामध्यें व इराणच्या सरहद्दीवर अझरबैजनसारखीं राष्ट्रें रशियन लोकशाहीचा भाग झाल्यामुळें त्यांस या बाबतींत तटस्थ रहावें लागेल. चीन, हिंदुस्थान, मोरोक्को, त्रिपोली येथील मुसुलमान लढाईच्या वेळीं तुर्काच्या उपयोगी पडणें फारसें शक्य नाहीं. अफगाणिस्तानला स्वतंत्र राष्ट्राची पदवी जरी मिळाली असली तरी अफगाणिस्तानची लोकसंख्या फारच थोडी आहे, आणि युद्धांत सर्व मुसुलमानी राष्ट्रे जरी पडलीं तरी युद्धांत सामान व सदर पुरवण्याइतकी ताकद या सर्व राष्ट्रांत राहील किंवा नाहीं याची शंका आहे.