प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

ग्रीकरोमन काळ - यूरोपखंडाला सुसंघटित स्वरूप या प्राचीन काळांतल्या दोन मोठ्या सामान्यानंतर आलें. त्यांपैकीं एक रोमन उर्फ आर्यसंस्कृति स्वीकारलेले इटालियन लोक आणि कार्थेजियन लोक यांच्यामध्यें जमिनीवर व समुद्रावर झालेला सामना होय व दुसरा ग्रीक व इराणी लोकांच्यामध्यें प्रथम यूरोपमध्यें मॅरेथान येथें व नंतर आशियांत अलेक्झांडरच्या वेळीं झालेला. ग्रीकांनीं मिळालेल्या विजयानें उत्साहित होऊन अथेन्स येथें तत्वज्ञानाची व अलेक्झांड्रिया येथें भौतिक शास्त्रीय संशोधनाची पुष्कळ वाढ केली. तिकडे रोमन लोकांनीं सशास्त्र कायदेपद्धतीची व सुराज्यव्यवस्थेची उत्तम वाढ केली. ग्रीकांनीं ग्रीक वाड्मयाचा व ग्रीक संस्कृतीचा प्रसार केला व रोमन लोकांनीं लॅटिन भाषा व लॅटिन संस्कृतीचा प्रसार केला. उलट पक्षीं इराणी लोक व कार्थेजिनीयन लोक यांनीं तसलें कोणतेंच कार्य हातीं घेतल्याचें दिसत नाहीं.

पुढें ग्रीक राष्ट्र व रोमन राष्ट्र यांच्यामध्यें सामना सुरू होऊन त्यांत उभयतांनीं एकमेकांस अंशतः जिंकलें म्हणजे राजकीय दृष्ट्या रोमन राष्ट्रानें ग्रीक राष्ट्रास जिंकलें. तर उलट ग्रीकचा विजय बौद्धिक होता. तत्त्वज्ञान, वाड्मय व कला यांच्या क्षेत्रांतील तो होता. रोमन साम्राज्याच्या इतिहासांत आगस्टाईन युग प्रसिद्ध आहे. कायदेशास्त्र तर रोमन राष्ट्रानें फार परिणत केलें, स्पेन व ब्रिटन येथील रानटी टोळ्यांनां त्यानें लॅटिन संस्कृति देऊन सुधारलें; पण ग्रीक संस्कृतीपुढें मात्र रोमन राष्ट्र पराभूत होऊन ग्रीक संस्कृतिमय बनलें. या संस्कृतिभवनास मासिडोनियाच्या अलेक्झांडरपासून सुरूवात झाली पण त्याचें कार्य अपुरें राहिलें. तथापि पूर्वेकडे बाल्कनप्रांतापासून तारसपर्वतापर्यंतचा मुलूख ग्रीक संस्कृतीनें संस्कृत झाला. यूफ्रेटीसनदीकडील प्रदेश, व सीरिया आणि ईजिप्त हे देश ग्रीक संस्कृतीनें लवकरच व्यापले. आणि अखेर ग्रीक संस्कृतीनें रोमन राष्ट्रावर आपला पूर्ण पगडा बसविला. इकडे इराणवरील ग्रीकांची सत्ता लयास जाऊन तिच्या जागीं रोमन सत्ता सुरू झाली. याच सुमारास इराणच्या पूर्वेस हिंदुस्थान व चीन या दोन देशांत बौद्धधर्मानें मोठी क्रांति घडवून आणली. या बौद्ध संप्रदायद्वारा भारतवर्षांत शिरलेल्या आर्यन लोकांच्या शाखेनें विस्तीर्ण आशिया खंडाच्या अर्ध्याअधिक भागांत आपल्या संस्कृतीचा प्रसार केला. रानटी लोकांस उच्च संस्कृतीखालीं आणण्याचें जे कार्य पुढें ख्रिस्ती संप्रदायानें हातीं घेतलें तेंच कार्य त्या संप्रदायाच्या कित्येक शतकें अगोदर भारतीय संस्कृतीच्या या बौद्ध संप्रदायशाखेनें मोठ्या प्रमाणावर व यशस्वीपणें केलें होतें.