प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

फ्रान्सचें वर्चस्व.- यानंतरच्या काळांत यूरोपखंडांत अनेक राष्ट्रांचा समुदाय आपापल्या ऐतिहासिक परंपरेनुसार स्वतःची प्रगति करून घेण्याचा प्रयत्न करीत असलेला दृष्टीस पडतो. तीस वर्षांच्या युद्धामध्यें जर्मनीचे दोन विभाग पडले. एक उत्तरेकडला प्रॉटेस्टंट पंथी पक्ष; याला स्कँडिनेव्हियाची मदत होती व दुसरा दक्षिणेकडील बादशाही पक्ष हा तुर्कांबरोबर झालेल्या युद्धामुळें सांप्रदायिक दृष्ट्या व लष्करी दृष्ट्या बलिष्ठ बनला होता. फ्रान्स देशहि या सुमारास बलिष्ठ बनला होता; तो इतका कीं, त्यानें राजकीय सामर्थ्यांच्या जोरावर नवा प्रॉटेस्टंट धर्मपंथ पूर्ण दडपून टाकून कॅथोलिक पंथाचा सुसंघटितरीत्या पुरस्कार केला. तथापि अशा स्थितींतहि रिशेल्यूच्या एकांतिक सांप्रदायिक धोरणाला पाठिंबा देऊन उत्तरेकडील जर्मन लोकांनां हॅब्सबर्ग घराणें व दक्षिणेकडील कॅथॉलिक पंथ यांच्या विरूद्ध मदत करून आपला शेजारी जो जर्मनी देश त्याला राजकीय दृष्ट्या कमकुवत स्थितींत ठेवण्याचें कार्य फ्रान्सनें साधिलें. स्पेनमधील हॅब्सबर्ग राहघराण्यानें इंग्लंडवर आर्मेडा नांवाचें प्रचंड आरमार पाठविलें आणि नेदर्लंडमधील प्रॉटेस्टंट लोकांबरोबर सतत ८० वर्षें झगडा चालू ठेविला. या झगड्यांत अखेर स्पॅनिश हॅब्सबर्ग घराण्याला अपयश आले. त्याचप्रमाणें आस्ट्रियन हॅप्सबर्ग घराण्याला उत्तर जर्मनांबरोबरच्या झगड्यांत हार खावी लागली. पुढें लवकरच फ्रान्सबरोबरच्या झगड्यांत स्पेनचें राष्ट्र कमकुवत बनलें. इंग्लंडमधील क्रॉमवेलनें डनकर्क येथें फ्रान्सचा पक्ष घेऊन कॅथॉलिकपक्षपाती स्पेनवर शेवटचा आघात केला आणि त्या योगानें कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट या दोन ख्रिस्त धर्मपंथांतील यादवी युद्धें कायमची बंद पाडिलीं. लवकरच पीरिनीजच्या तहानें स्पेन गतप्रभ ठरून फ्रान्स महत्पदाप्रत पोंहचल्याचें ठाम ठरलें.