प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
यूरोपांत मुसुलमानांची चढाई. - तथापि, अगदीं पश्चिमेकडे मुसुलमानांनीं लॅटिन ख्रिस्ती प्रदेशावर हल्ला चढविला होता. जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून एका पिढीइतक्या काळाच्या आंतच त्यांनीं संपूर्ण स्पेन व बहुतेक गॉलचा नैॠत्य भाग हस्तगत केला. शेवटीं टूर्सच्या लढाईनें त्यांची गति कुंठित करून, पिरीनीजच्या पार मागें त्यांनां हाकून लाविलें. हें मुसुलमानांशीं युद्ध त्याच्या परिणामांवरून पाहातां, ख्रिस्ती संप्रदायाच्या इतिहासांतलें एक अतिशय आणीबाणीचें म्हणता येईल. ज्यानें हें युद्ध जिंकलें तो फ्रँक मानववंश यानंतर सहाजीकच यूरोपखंडांत पुढे आला.