प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
रोमन साम्राज्य व धर्मसंस्था.- या संधीस जर बिझँशियम इस्लामांच्या हातीं पडलें असतें, तर मात्र डॅन्यूब व पिरीनीज प्रदेशांतील ख्रिस्ती व मुसुलमान यांच्या प्रत्यक्ष भांडणांपासून सर्व ट्यूटॉनिक व लॅटिन यूरोप मिळून एकच राष्ट्र तयार होणें शक्य होतें. पण चार्लस दि ग्रेट नंतर सहा शतकेंपर्यंत माळरान व ओसाडी या बाजूनें होणारे हल्ले कमी कमी होत गेले व रोमन साम्राज्याच्या पडद्यामागील उत्तर व पश्चिम यूरोप आशियांतून त्यांच्यावर होणा-या हल्ल्यांच्या भीतीपासून निखालस मुक्त झालें. याचा परिणाम असा झाला कीं, एकीची वाढ खुंटत जाऊन पूर्वींचे भांडणतंटे सुरू झाले. पुढील धमधुमीच्या काळांत इस्लामाविरूद्ध झालेल्या क्रूसेड युद्धांतून सर्व ख्रिस्तीमतानुयायी एकत्रित करण्याचें ध्येय दिग्दर्शित केले गेले; तथापि रोमन साम्राज्य व पोपराज्य यांच्यामधील भांडणांत लॅटिन आणि ट्यूटॉनिक हें मूलभूत द्वंद्व एकसारखें वावरत होतें. रोमनसाम्राज्य नांवालाच कायतें रोमन होतें, पण खरें पाहतां ते जर्मन होतें, पोप आणि साम्राज्य यांच्या भांडणांत, पोपचा जय झाला. एवंच, चार्लसच्या मृत्यूनंतरचीं तीन शतकें वांझ निघालीं नाहींत असें निःसंशय म्हणतां येईल. धर्मसंस्थेनें लॅटिन आणि ट्यूटॉनिक यूरोप एकाच धार्मिक रचनेंत गोंवून टाकिलें व तें किती सधन व सामर्थ्यवान केलें याची कल्पना त्यावेळच्या अनेक मोठ्या देवळांमठांच्या हल्लीं दिसून येणा-या अवशेषांवरून होईल. उलट पक्षीं, साम्राज्यानें लष्करी सरकार स्थापणाच्या आपल्या खटपटीनें यूरोपला क्षात्रधर्माची दीक्षा दिलीं; या गोष्टीचें स्मारक म्हणून आपणांस अनेक जुने पडके किल्ले दिसतात.