प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

विसाव्या शतकांतील प्रवृत्ती - चालू विसावें शतक म्हणजे आरमारी सत्तेचा व वैमानिक विकासाचा काळ आहे असें म्हणावें लागते. या काळातील मुख्य घडामोडी ब्रिटनचें आरमार व अमेरिकेचें आरमार यांच्या परस्पर संबंधावर अवलंबून आहेत. या दोन बलिष्ठ आरमारी राष्ट्रांमध्यें जर मित्रभाव आणि एकी राहिली तर जगांत स्वातंत्र्याचें पाऊल पुढें पुढें पडत राहील. पण जर या दोन राष्ट्रांत दुही माजली तर पूर्व यूरोपांतील आणि आशियातील राष्ट्रे लष्करी सामर्थ्याच्या जोरावर आगगाड्यांनीं सैन्याच्या हालचाली सुलभ केल्यामुळें सुधारणेच्या उच्च शिखरावर चढलेल्या राष्ट्रांनां डोईजड होतील आणि जगाच्या सुधारणेच्या मार्गांत इतका भयंकर खो आणतील कीं, भविष्यकाळी जगाची स्थिति काय होईल त्याचा आज कांहींच अंदाज करतां येत नाहीं असें भय यूरोपीयांच्या लेखांत मधून मधून व्यक्त होतें. तथापि अशा त-हेनें एखाद्या रानटी जातीकडून आजचीं संस्कृत राष्ट्रें पादाकांत केलीं जातील असें भविष्य करण्यास आज जागा दिसत नाही. पुष्कळ ग्रंथकारांस पश्चिम यूरोपांतील राष्ट्रें तेवढींच सुसंस्कृत वाटतात व ती राष्ट्रें पूर्व यूरोपांतील किंवा ऐशियांतील राष्ट्राकडून पादाक्रांत केलीं जातील अशी त्यांस भीति वाटते. त्यांच्या मतानें मुसुलमानी राष्ट्रें व चीन ही राष्ट्रें सुशिक्षित दिसत नाहींत व त्यांपासून त्यांस भीति वाटत आहे असे दिसते. परवां ग्रीस व तुर्क यांमध्यें झालेल्या लढाईंत तुर्कांनीं जय मिळविला आहे आणि इराण व अफगाणिस्तान हीं राष्ट्रें अलीकडे हातपाय हलवूं लागलीं आहेत. त्यांनीं जर तुर्कांशीं एकमत करून त्यांचें अनुकरण केलें तर वरील भीति साधार ठरण्याचा संभव आहे. शिवाय चीनसंबंधीं लिहितांनां पिवळ्या बागुलबोवाची भीति श्वेतवर्णीयांस वाटूं लागली आहे असें आम्ही पूर्वीं म्हटलेंच आहे व भविष्यकाळीं ती भीति खरी ठरण्याचा संभव जरी नाहीं तरी एशियामध्यें यूरोपीयांस दादागिरी करतां येणार नाहीं. हिंदुस्थानहि आतां आपल्या हक्काबद्दल जागृत होऊं लागला आहे व इंग्लंडलाहि आतां हिंदुस्थान कायमचा हातचा गमवावयाचा नसेल तर त्यास अधिक राजकीय हक्क देणें व लष्करी व आरमारी बलानें स्वसंरक्षणक्षम बनविणें भाग आहे. इंग्लंडचें वाढतें साम्राज्य, त्याचा वाढता व्यापार, त्याचें वाढतें सामर्थ्य व वैभव याबद्दल अमेरिका व जपान यांस मत्सर वाटण्याचा संभव आहे व जशी अमेरिका अमेरिकनांकरितां तशी पूर्व पूर्वेकडील लोकांकरितां हें तत्त्व पुढेंमागें पुढें येण्याचा संभव आहे. आफ्रिकेंतहि स्वयंनिर्णयाच्या बाबतींत पण सध्यां यूरोपीयांच्या फायद्याकरितां हें तत्त्व पुढें करण्यांत येत आहे.

तसेंच आज जर्मनी जरी पूर्णपणें चिरडल्यासारखा दिसत आहे तरी या मानहानीचें शल्य जर्मनीच्या अंतःकरणांत खूप खोल जाऊन बसेल व या अडचणींतून कोणत्याहि मार्गानें एकदां जर्मनीची सुटका झाल्यावर तो या अपमानाचा सूड येन केन प्रकारणे घेण्याचा तयारीस लागेल व आज जर सर्व विजयी दोस्त राष्ट्रें पूर्णपणें हतबल झालेलीं नसतीं व युद्धास कंटाळलीं नसतीं तर या लुटीच्या वांटणीच्या वेळींहि दोस्त राष्ट्रांत चकमकी उडाल्याशिवाय राहिल्या नसत्या. पण यापुढें जर्मनी आपल्या शत्रूंस प्रत्यक्ष अगर गुप्तपणें त्रास देण्याची संधि केव्हांहि फुकट जाऊं देणार नाहीं व हा धुमसत राहिलेला द्वेषाग्नि जगाची निराळी न्याय्य घटना न झाल्यास पुढेंमागें अभूतपूर्व अशा जागतिक युद्धाच्या रूपानें पेट घेतल्याशिवाय राहणार नाहीं. त्यावेळीं राष्ट्रसंघ आपल्या शांतिमंत्रानें ही आग थांबविण्यास असमर्थ ठरेल व पुन्हां यूरोप खंड व सर्व जग युद्धाच्या वणव्यांत सापडेल मात्र त्यावेळीं परस्परविरुद्ध पक्षांत कोणतीं राष्ट्रें पडतील हें आज सांगतां येत नाहीं. तथापि आजपर्यंतच्या अनुभवावरून ब्रिटन आपल्या मुत्सद्देगिरीनें यशस्वी पारड्यांतच पडेल असें अनुमान करण्यास हरकत नाहीं.