प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
प्राचीन शैलीचे अंक:- अंक म्हणजे संख्यादर्शक दृश्य चिन्हें अशी जर आपण त्या शब्दाची व्याख्या केली, तर हाताचीं बोटें हेच वस्तुत: पुरातन काळांतील अंक होते असें आपणांस म्हटलें पाहिजे. संख्या दर्शविण्याकरिंतां व हिशेब करण्याकरितां दृश्य चिन्हांचा उपयोग केवळ लेखन कलेहूनच नव्हे, तर दशमानात्मक संख्यावाचक परिभाषेहूनहि अधिक प्राचीन आहे. तात्पुरत्या हिशेबासाठी हाताची बोटें अंकांचे कार्य करीत; परंतु संख्यांची कायमची नोंद करून ठेवण्याची जेव्हा गरज पडूं लागली, तेव्हा अंकासांठी कांही तरी लिखित चिन्हांची अवश्यकता भासूं लागली. अशा स्थितींत एक ही संख्या दर्शविण्याकरिंता एक रेघ काढावी असें आपल्या पूर्वजांस सकृद्दर्शनीं सुचले असल्यास त्यांत नवल नाहीं. इजिप्तमधील चित्रलिपीत एकपासून नऊपावेतोंचे अंक अनुक्रमें एक ते नऊ उभ्या रेषा काढून दाखवीत असत. दहा, शंभर व हजार ह्या संख्यांकरितां निराळी चिन्हें असून लक्षाकरितां बेडकाचे व दहा लांखाकरितां आश्चर्यांने बाहू पसरलेल्या माणसाचें चित्र काढीत असत. चित्रलिपीपासून निघालेल्या फिनीशियन लिपींत विसाकरितां आणखी एक निराळें चिन्ह होतें. परंतु चित्रलिपीच्या हिअरेटिक म्हणजे पुरोहिती ( ही मिसरदेशीय पुरोहितांची लिपि असावी असा आरंभी चुकीचा समज झाल्यामुळें तिला हिअरेटिक हें चुकीचें नांव पडलें आहे) रूपांत पांचापासून नवापावेतोंच्या अंकास व दहा, वीस, तीस इत्यादि नव्वद पावेतोंच्या सर्वच दशकांस अलग अलग चिन्हें होतीं. दोन, तीन व चार ह्या संख्यांच्या प्राचीन रूपांत एवढीच सुधारणा करण्यांत आली कीं, पूर्वी त्यांतील रेषा अलग अलग काढीत असत, त्या आतां कलम न उचलता एकमेकीस जोडून काढूं लागले. फिनीशियन अंकापासूनच पुढें पाल्मीरियन व सिरिअक अंकाची उत्पत्ति झाली व चित्रलिपीच्या पुरोहिती अंकांपासून डेमोटिक अंक निघाले. डेमोटिक लिपि व तिचे अंक यांची उत्पत्ति प्राचीन मिसर देशाच्या २५ व्या राजवंशापावेतों म्हणजे ख्रि. पू ७१५ ते ६५६ सालापावेतों आपणांस नेतां येते. परंतु इजिप्शियन लोकांनी चित्रलिपीतील आपल्या जुन्या ओबडधोबड अकांपासून पुरोहिती अंक केव्हा तयार केले व ह्या पुरोहिती अंकांपासून डेमोटिक अंक केव्हां निघाले याचा पत्ता लागत नाहीं. तथापि पुरोहिती व डेमोटिक अंकात विशेष फरक नसल्यामुळें त्यांच्या काळांत फारच थोडें अंतर असलें पाहिजे हें खास. पाल्मीरियन व सिरिअक अंकतर जवळ जवळ चित्रलिपींतील अंकांइतक्याच प्राथमिकावस्थेंत दृष्टीस पडतात.