प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.  

पहिल्या आर्यभटाचे अक्षरांक:- शास्त्रीय ग्रंथामध्यें ह्या पद्धतशीर अक्षरांकांचा उपयोग पहिल्या आर्यभटानें इ. स. ४९९ मध्यें रचलेल्या आपल्या ‘ आर्यभटीय ’ ग्रंथातं प्रथम केलेला आहे. त्यानें योजिलेल्या पद्धतीत कवर्गापासून पवर्गापावेतोंचीं पंचवीस अक्षरें पहिल्या पंचवीस अंकांकरितां नियुक्त केलीं असून, त्यापुढच्या आठ वर्णांचा ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९० व १०० हे अंक दाखविण्याकरितां उपयोग केला आहे. स्वरांमध्यें र्‍हस्व आणि दीर्घ असा भेद मानला नसून ‘ अ ’ ला एक व इ, उ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ आणि औ यांनां अनुक्रमें शंभर व शंभरचा दुसरा, तिसरा, चौथा, पांचवा, सहावा, सातवा व आठवा घात असे अर्थं देण्यांत आले आहेत. व्यंजनास जोडलेला स्वर व्यंजनाच्या संख्येची आपल्या संख्येइतकी पट दर्शवीत असून संयुक्त व्यंजंनातींल स्वर त्याच्या अवयवीभूत प्रत्येक व्यंजनाबरोबर घ्यावयाचा असतो. उदाहरणार्थ, महायुगांत किती भूभ्रमणें होतात हें आर्यभटाचें ‘ ङिशिवुण्लख्षू’ ह्या अक्षरांकसंख्येनें सांगितलें असून तिचा अर्थ १५,८२,२३,७५,२०० असा आहे.