प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.

दशकपद्धतीच्या संख्यालेखनाचा आस्तेकदम विकास:- आज गणितशात्रांत जी एवढी प्रगति झाली आहे, तिच्या मुळाशी असलेली नऊ अंक व शून्यांचे चिन्ह यांवर बसविलेली दशमानात्मक संख्यालेखनपद्धति एकदम अस्तित्वांत आली नसून, प्राथमिक अंकांत व संख्यालेखन पद्धतींत सुधारणा होत होत कालांतरानेच ती हल्लींच्या परिणतावस्थेस पोंचली असली पाहिजे हें उघड आहे. व्यवहारांत हिशेब करण्यास अडचण पडूं लागल्यामुळें मनुष्यास प्रथम अंक व नंतर साधारण मोठ्या संख्या लिहिण्याकरितां एखादी सोईची संख्यालेखनपद्धति तयार करण्याची अवश्यकता भांसू लागली असावी. हिशेबाच्या निरनिराळ्या पद्धती व तदनुषंगिक अंकपाट मूलत: आपल्या हाताकडें पाहून मनुष्यास सुचले असावे, ह्या सार्वत्रिक कल्पनेच्या पुष्ठयर्थ ‘ अर्वाचीन संख्याकांची पूर्वपाठिका’ नामक आपल्या ग्रंथांत बेली साहेबांनी जें विवेचन केलें आहें त्याचा व इतर साहित्याचा उपयोग करून आम्ही पुढील माहिती देत आहों.