प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.

ख्रिस्ती शकापूर्वींच्या इजिप्शियन व हिंदी अंकांची तुलना:- इजिप्शियन लोकांचे सुधारलेले पुरोहिती अंक व प्राचीन हिंदी अंक यांची तुलना केली असतां असें आढळून येईल कीं (१) दोन्हीहि अंकपाठांत पहिले तीन अंक रेषानींच दर्शविलेले आहेत; (२) दोहोंतील अंकाची म्हणजे संख्यावाचक पृथक् दृश्य चिन्हांची-संख्या वस्तुत: सारखीच असून,ज्या संख्येकरितां पुरोहिती अंकपाठांत निराळें चिन्ह आहे त्याच संख्येकरितां हिंदी अंकपाठांतहि बहुधा निराळी आकृति दृष्टीस पडते; (३) आणि दोनशें तीनशें इत्यादी शभंराच्या पटी दाखवविणार्‍या शतकाच्या आंकड्यांकरितां व दोन हजार, तीन हजार इत्यादि हजाराच्या पटी दाखविणार्‍या सहस्त्राच्या आंकड्यांकरितां, दोहोंतहिं निराळीं चिन्हें न योजितां पटदर्शक चिन्हेंच शंभराच्या किंवा हजाराच्या अंकास जोडून कार्य साधिलेलें आहे. परंतु ह्या तीन गोष्टी सोडून दिल्या तर आपणांस इजिप्शियन व भारतीय अंकपांठांत कोठेंहि सादृश्य आढळून येत नाहीं. पहिल्या तीन अंकांकरितां दोहोंतहि रेषाच आहेत, तरी एकांत त्या आडव्या तर दुसर्‍यांत उभ्या आहेत. शिवाय ह्या तीन अंकाच्या इजिप्शियन आकृती किंचित् परिणतावस्थेंत दिसतात, तर भारतीय अंकात त्यांचें अद्याप परिवर्तन व्हावयाचें आहे. चाराकरितां इजिप्शियन लोकांनीं मूळची रेषायुक्त आकृतीच कायम ठेविली आहे; पण हिंदुस्थानांत त्या संख्येकरितां निराळी आकृति सांपडते. राहिलेल्या अंकांमध्यें नऊ खेरीज करून दुसर्‍या कोणत्याही हिंदी अंकाचें तीच संख्या दर्शविणार्‍या इजिप्शियन अंकाशीं सादृश्य दिसून येत नाहीं. शतकांच्या व सहस्त्रकांच्या आंकड्यांत पटी दाखविणारीं चिन्हेंहि दोन्ही अंकपाठांत सारखी नाहींत. हिंदुस्थानांत दोनशेंकरिंतां व तीनशेंकरितां शंभराच्या अंकास व दोन हजारांकरितां व तीन हजारांकरितां सहस्त्राच्या अंकास उजव्या बाजूस अनुक्रमे एक व दोन आडव्या रेषा काढण्याचा प्रघात होता. परंतु चारशेंपासून नऊशेंपावेतों शतकांचे आंकडे व चार हजारांपासून नऊ हजारांपावेतों सहस्त्रकांचे आंकडे शंभराच्या व हजाराच्या अंकास अनुक्रमें चारपासून नऊपावेतोंचे अंक जोडूनच सिद्ध करीत असत. इकडे इजिप्तमध्यें दोनशें व तीनशें हे आंकडे त्या त्या हिंदी आंकड्याप्रमाणें शंभराच्या अंकास अनुक्रमें एक व दोन रेषा जोडूनच तयार करीत; पण ह्या रेषा उभ्या असून त्या डाव्या बाजूस लाविल्या जात. चारशेंकरितां शंभराच्या अंकास हिंदी पद्धतीप्रमाणें चाराचा अंक न जोडतां त्या अंकाच्या वर डाव्या बाजूस तीन रेषा काढीत असत. सहस्त्रकांचे आंकडे बनविण्यांत याहूनहि अधिक भिन्नता दिसून येते. कारण दोन हजारांपासून चार हजारांपावेतोंचे आंकडे सहस्त्राच्या अंकावर अनुक्रमें दोन ते चार उभ्या रेषा काढून तयार केलेले आढळून येतात. इजिप्शियन अंक उजवीकडून डावीकडे लिहीत जाण्याची वहिवाट होती, म्हणजे १९ ही संख्या काढण्याकरितां दहाव्या अंकाच्या डाव्या बाजूस नवाचा अंक लिहीत असत. हिंदुस्थानांतील संख्यालेखन पद्धतींत ह्याच्या उलट प्रकार दृष्टीस पडतो. अशोककालीन व नानाघाटच्या शिलालेखांत ह्या विधानाच्या पुष्टयर्थ प्रत्यक्ष असा कांहीच पुरावा सांपडत नाहीं, तरी पटीचें चिन्ह जोडण्याच्या तत्कालीन रीतीवरून व नंतरच्या दानपत्रांत व शिलालेखांत ज्या संख्या सांपडतात त्यावंरून त्या काळीं मिश्र संख्येंत मोठ्या अंकाच्या उजव्या बाजूस लहान अंक लिहीत असले पाहिजेत असें अनुमान काढतां येतें.