प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.  
 
रोमन अक्षरांक:- खलीप वलीद ( इ. स. ७०५-७१६) याच्या कारकीर्दीत अरब लोकांमध्यें देखील संख्या चिन्हांकरितां अक्षरांचाच उपयोग करीत असल्याचें आढळून येतें. आपणां सर्वांत परिचित असलेली रोमन लोकांची अंकमालाहि अक्षरात्मकच असावी असें पहातांक्षणीच वाटतें. तरी ती कल्पना बरोबर आहे असें खात्रीनें म्हणतां येत नाही. या अंकमालेंत शंभर व हजार या संख्यांकरितां वापरण्यांत येणारी C व M हीं चिन्हें सेंटम व मिल्ले ह्या त्या त्या संख्यावाचक शब्दांची आद्याक्षरें आहेत. तथापि ह्या संख्यांकरितां अनुक्रमे आडव्या किंवा उभ्या रेषेनें विभागलेलें वर्तुळ व उभ्या रेषेनें विभागलेलें वर्तुळ अशीं दोन जुनीं चिन्हें आढळण्यांत येतात. अद्यापहि हजाराकरितां C१)  असले चिन्ह छापील पुस्तकांत क्वचित् प्रंसगी वापरलेलें दृष्टीस पडतें. पांचशेंकरितां प्रचारांत असलेले D हें चिन्ह हजारच्या चिन्हाचाच अर्धभाग असल्याविषयीं पुरावा देत असून, पन्नासासाठी वापरण्यांत येणार्‍या L ह्या चिन्हाचें जुनें रूप (L) तेंहि शंभराच्या आकृतीचाच अर्धाभाग असल्याचें सुचविते. प्रस्तुतचे पांचाचे चिन्ह तर दहाच्या आकृतीचा अर्धभाग असल्याचे उघड दिसत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करतां रोमन अंकमाला निदान आरंभी तरी अक्षरात्मक नव्हती असें दिसतें. तथापि सर्वमान्य समजुतीच्या पुष्टयर्थ आतां अशी एक कल्पना सुचविण्यांत आली आहें कीं, दहा, पन्नास व शंभर या संख्यांचे अर्वाचीन अक्षरांक आरंभी X,ψ व Ø हीं ग्रीक अक्षरें होतीं.