प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
अक्षरांककल्पनेचा जनक कोण ?:- अंकांकरितां अक्षरांचा पहिल्या आर्यभटापूर्वी कोणीहि उपयोग केलेला आढळून येत नाहीं तरी, अक्षरांकमालेच्या कल्पनेचा तोच आद्यजनक होता असें मात्र निश्चयेंकरून म्हणतां येणार नाहीं. कारण, पाणिनीच्या १-३-११ ह्या सूत्रावरील कात्यायनाचें वार्तिक व कैयटानें दिलेलें त्याचें उदाहरण यांचें अवलोकन करतां असें दिसून येतें कीं, त्याच्या स्वरित चिन्हांमध्यें १,२,३, इत्यादि संख्या दर्शविण्याकरिंतां शिवसूत्रांतील वर्णक्रमानुसार अक्षरें वापरलीं होतीं.