प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
अंकचिन्हें कोणीं कोणापासून घेतलीं:- आज सर्वत्र प्रचारांत असलेली केवळ संख्यालेखनुपद्धतीच नव्हे, तर नऊ प्राथमिक अंक व शून्य यांची चिन्हेंहि मुळांत हिंदीच आहेत. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धांत र्हीम्स येथें जर्बर्ट यानें स्थानरेषापटावर वापरलेली चिन्हें काय, किंवा ‘ जॉमेट्रियाचें कर्तृत्व ज्याच्याकडे देण्यांत येंतें त्या बोएशसची पांचव्या शतकांतील चिन्हें काय, नवीन संख्यालेखनपद्धतींतील त्या त्या हिंदी अंकांसारखां असून, पुन्हां हे नवीन हिंदी अंक जुन्या हिंदी संख्यालेखनपद्धतीतील अंकांपासून तयार झालेले आहेत. अरबांनी आपले अंक हिंदी अंकांपासून तयार केले असें अलबेरूणीनेंच म्हटलें आहे. स्वत: अरब लोकांत दोन प्रकारचे हिंदी अंक प्रचलित असून त्यांतील पश्चिमेकडे ज्यांचा प्रसार होता त्यांस घोबर [ घोबर=धुळ ] अंक असें म्हणत असत. पूर्वेकडील व पश्चिमेकडील अरबी अंकांत विशेष फरक आढळून येत नाही हें जरी खरें आहे तरी, नवीन पद्धतीचें संख्यालेखन सुरू होण्यापूर्वी यूरोपांत स्थानरेषापटावर जे अंक वापरण्यांत येत होते त्यांचे पूर्वेकडील अरबी अंकापेक्षां स्पेन व आफ्रिका या देशांत प्रचारात असलेल्या घोबर अंकाशी अधिक साम्य होतें [ ब्रिटानिका], निओपायथॅगोरियन्सनीं ‘ सायफॉस ’,प्लानूडस व निओफयटीस ह्या ग्रीक ग्रंथकारांनीं ‘झिफ्रा‘ व लिओनार्डो ऑफ पिसा यानें ‘झेफिरो’ असे जे निरनिराळे शब्द शून्याकरिता प्राचीनकाळी वापरलेले आढळतात, ते सर्व, संस्कृत भाषेंतील शून्य म्हणजे मोकळी जागा ह्या शब्दाचा समानार्थक अरबी भाषेंत जो ‘सिफ्र’ असा शब्द आहे त्यापासून घेतलेले असून, इंग्रजींतील झीरो हा शब्द लिओनार्डौच्या झेफिरो शब्दापासून निष्पन्न झाला आहे [ बेली ]. त्याचप्रमाणें ग्रीक झिफ्रा ह्या शब्दांचें फ्रेंचमध्यें ‘ शीफ्र ’ असें रूपांतर होऊन त्यापासून मग इंग्रजीत सायफर हा शब्द रूढ झाला. सोबत जे आकृतिपट दिलेले आहेत त्यांवरून प्राचीन शैलीच्या हिंदी अंकाचें नवीन शैलीच्या हिंदी अकांत कसें परिवर्तन झालें, व ह्या नवीन शैलीच्या जुन्या हिंदी अंकांचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील प्राचीन अरबी अंकांशीं बोएशसच्या अंकांशी व अर्वाचीन अंकांशी कितपत साम्य आहे तें दिसून येईल.