प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.   
 
इतर अक्षरांक:- याशिवाय दक्षिणेंत मलबार प्रांतांत व तेलगू प्रदेशांत पुस्तकांच्या पानांवर अनुक्रमसंख्या देण्याकरितां जी एक प्रकारची अक्षरांकमाला वापरण्यांत येत होती, तींत कपासून ळपावेतोंचे ३४ वर्ण अनुक्रमाने पहिल्या ३४ अंकांकरितां घातले असून पुढच्या ३४ अंकांकरितां का खा इत्यादि आकारयुक्त व्यंजनें, त्याच्या पुढील ३४ अंकांसाठी कि खि आदिकरून इकारयुक्त व्यंजनें, अशा रीतीनें बाराखडींतील सर्व अक्षरांचा उपयोग करून (३२x१२=) ४०८ पावेतोंचे अंक अक्षरांनी दाखविले आहेत [ ब. सा. इं. पॅ. पान ८० ]. ब्रह्मदेशांतील कांही जुन्या हस्तलिखित पुस्तकांत १-१२ करितां कची बाराखडी, १३-२४ करितां खची. २५-३६ करितां गची अशा रीतीनें सर्व व्यंजनांच्या बाराखड्यांचा अंक दर्शविण्यासाठी उपयोग केला आहे. सिलोनच्या हस्तलिखितातहि पत्रांक दर्शविण्याच्या कामीं ह्याच अनुक्रमानें बाराखड्यांतील अक्षरें योजलीं आहेत; तेथील अंकमालेंत एवढाच फरक आढळून येतो की, प्रत्येक बाराखडीत ऋ, ऋ, लृ, हे स्वर अधिक असल्यामुळें, तिच्या योगानें बाराच्या ऐवजी सोळा अंक दाखवितां येतात [ बुहलर; इं. पॅ. पा. ८७].