प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.   

अर्वाचीन अंकाच्या व संख्यालेखनपद्धतीच्या इतिहासांतील सर्वसंमत मुद्दे:- अर्वाचीन अंक व संख्यालेखनपद्धति ह्यांच्या उत्पत्तीसंबंधी ज्या गोष्टी आज सर्वसंमत झाल्या आहेत त्या पुढें दिल्याप्रमाणें आहेत. आजच्या पूर्णावस्थेस आलेल्या शून्यान्वित नऊ अंकी संख्यालेखनपद्धतीचा उदय हिंदुस्थानांत झाला असून आठव्या शतकाच्या अखेरीच्या सुमारास अरब लोकांनां तिचें ज्ञान झालें. नवव्या शतकाच्या आरंभी अरब ग्रंथकार अल ख्वारिझ्मी यानें अंकगणितावर एक पुस्तक लिहून तिचें अरबींत विवरण केलें. बाराव्या शतकांत यूरोपखंडांतील लोक ती अरबांपासून शिकले व तिच्यावर बसविलेल्या अंकगणितास त्यांनीं ‘ अल्गोरिट्मस् ’ ‘ आल्गोरिथम् ’ किंवा ‘ अल्गोरिझम् ’ असें नांव दिलें. वर सांगितलेलीं तीनहि प्राचीन यूरोपीय अंकगणिताची नांवें अल ख्वारिझ्मी ह्या शब्दाचेच अपभ्रंश असावे असा रेनॉड यानें जो तर्क केला होता तो आतां सदरहु अरब पंडिताच्या ग्रंथाच्या (बहुधा बाथचा अल्डेहार्ड यानें केलेल्या) लॅटिन भाषांतराची एक हस्तलिखित प्रत केंब्रिज येथें सांपडल्यापासून खरा ठरला आहे, प्रस्तुत हिंदी संख्यालेखनपद्धतीचा, पुढें तेराव्या शतकांत होऊन गेलेल्या ‘ लिओनार्डो ऑफ पिसा ’ व ‘ मॅक्झिमस प्लॅनूडस ’ ह्या पंडितांनी यूरोपच्या अनुक्रमें पश्चिम व पूर्व भागांत प्रसार केला [ ब्रिटानिका ].