प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
 
इजिप्शियन व हिंदी अंकपाठाच्या जन्यजनक भावासंबधीं विचार:- प्राचीन इजिप्शियन व हिंदी अंकपाठांत जी थोडीबहुत साम्यता दिसून येते तिच्यावरून ह्या दोन्ही देशांतील अंकात कांही तरी परस्परसंबंध असला पाहिजे अशी साहजिकच शंका येते. प्राचीन काळीं हिंदुस्थानांत तयार झालेल्या ऐषआरामाच्या वस्तू इजिप्तच्या बाजारांत विक्रीस जात असत असा कांहीं पुरावा सांपडत असल्यामुळें ही शंका अगदींच निराधार आहे असें म्हणतां येत नाहीं. व्यवहाराबरोबर हिशेब येतो, हिशेबाबरोबर रूजुवात येते आणि रूजुवातीबरोबर एकमेंकास समजेल अशा व्यवहारपद्धतीची उत्पत्ति होते. बर्नेलच्या मतें हिंदी लोकांनीं इजिप्तच्या डेमोटिक अंकपाठांतून आपले अंक घेतले असून हिंदुस्थानांत आल्यावर पुढें ते अंक विकास पावले. ई. सी. बेली यानें ‘ अर्वाचीन अंकाची पूर्वपीठिका ’ नामक आपल्या ग्रंथांत भारतीय अंकपाठ इजिप्तच्या चित्रलिपीपासून निघाला आहे असें सिद्ध करण्याचा प्रयत्‍न केला असून, बहुतेक प्राचीन हिंदी अंक फिनीशियन, बॅक्ट्रियन व अक्कॅडियन अंकांपासून व अक्षरांपासून तयार केलेले होते असें दाखविलें आहे. हिंदुस्थानांतील लोकांनी आपले निरनिराळे अंक निरनिराळ्या काळीं निरनिराळ्या देशच्या अंकांपासून किंवा अक्षरांपासून बनविले, असलें विचित्र मत बुहलर यास मान्य नसून त्यानें असें प्रतिपादन केलें आहे कीं, ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकांत व त्यापूर्वी इजिप्त आणि हिंदुस्थान ह्या दोन देशांत दळणवळण असल्याविषयीं खात्रीलायक पुरावा उपलब्ध झाला तर हिंदी अंकांची उत्पत्ति इजिप्तच्या पुरोहिती अंकांपासून झाली असें निश्चयात्मक म्हणावयास हरकत नाहीं.

वास्तविक पाहिलें असतां फिनीशियनमधील एकट्या २० च्या व पुरोहिती व डेमोटिक अंकांतील एकट्या ९ च्या चिन्हाशिवाय विदेशीय अंकपाठांतील दुसर्‍या कोणत्याहि अंकाचें हिंदी अंकाशीं सादृश्य दिसून येत नाहीं. हिंदुस्थानांतील लोकांनी आपला अंकपाठ तयार करण्याच्या कामीं इजिप्तमधील पुरोहिती किंवा डेमोटिक अंकाचा जर खरोखर कांही उपयोग केला असता, तर आपल्या अंकपाठांतील एक, दोन व तीन ह्या अंकांच्या प्राथमिक रूपांत कांहीनाकांही तरी सुधारणा केल्याशिवाय ते राहिले नसते. या वादांतील महत्त्वाचे मुद्दे म्हटले म्हणजे (१) एकंच्या व दशकाच्या नऊ नऊ अंकांकरिता नऊ नऊ पृथक् चिन्हें वापरण्याची व (२) शंभराचा किंवा सहस्त्राचा अंक पुन्हा:पुन्हां न लिहितां त्या अंकांची कोणती तरी पट असलेली शतकाची किंवा सहस्त्रकाची संख्या बनविण्याकरितां मूळ अंकास एखादें विवक्षित चिन्ह जोडण्याची कल्पना कोणीं कोणापासून घेतली हे आहेत. यांपैकीं पहिल्या मुद्दयावर कांहीच लिहितां येणें शक्य नाहीं. दुसर्‍या मुद्दयासंबंधीं मात्र आपणांस एवढें म्हणतां येईल कीं, ही कल्पना हिंदी लोकांस प्रथम सुचणें बरेच संभवनीय आहे. प्राचीन हिंदी अंकपाठांत उपध्मानीयाची चिन्हें आढळतात त्यावरून त्या अंकांचें परिवर्तन ब्राह्मणवर्गाच्या हातून झालें होतें असा बुहलर यानें ज्याप्रमाणें तर्क केला आहे, त्याचप्रमाणें व्यंजनांस लावण्यांत येणार्‍या दीर्घ व प्लुत स्वरांच्या चिन्हांच्या कल्पनेवरून दुप्पट व तिप्पट दर्शविण्याकरितां अनुक्रमे एक व दोन आडव्या रेषांचा उपयोग करण्याची कल्पना त्या वर्गासच सुचली असावी असे अनुमान केल्यास ते चुकीचें होणार नाही. तिनाच्या वरच्या पटींकरिता चार, पांच इत्यादी अंकांचा अशाच रीतीनें उपयोग करतां येईल ही गोष्ट नंतर त्यांच्या लक्षांत आली असावी. तथापि ही सुधारणा सुचल्यावर तिला अनुसरून दुपटीच्या व तिपटीच्या चिन्हांत बदल करणें सोइस्कर तर नव्हतेंच, पण उलट तिपटीकरितां दोन आडव्या रेषांऐवजी तत्कालीन तिनाचा अंक म्हणजे तीन आडव्या रेषा योजिल्यानें एक रेघ अधिक वाढून थोडी गैरसोयच झाली असती. पट दर्शविण्याकरिंता तोच तोच आंकडा वारंवार न काढतां कांहीं तरी चिन्ह वापरण्याची कल्पना इजिप्शियन लोकांनीं हिंदी लोकांपासून उचलली असावी. परंतु दीर्घ व प्लुत स्वरांच्या ज्ञानाभावीं ह्या कल्पनेंतील तत्त्व त्यांच्या ध्यानांत येणें शक्य नसल्यामुळें, त्यांना हिंदी कल्पनेचा नीटसा उपयोग करतां आला नाहीं, हें दोन हजार व तीन हजार ह्या संख्याकरितां सहस्त्राच्या अंकास एक व दोन रेषांऐवजी अनुक्रमें दोन व तीन रेषा त्यांनी जोडल्या आहेत त्यावरून उघड होत आहे. हिंदुस्थानांत ह्या तत्त्वाचा पुढें जो विकास झाला तोहि ह्याच कारणामुळें इजिप्तमध्यें होऊं शकला नसावा. कारण इजिप्शियन लोकांनीं चारशेंकरिंतां तीन व चार हजारांकरितां चार रेषांचा उपयोग केला असून पांचशें व सातशें ह्या संख्यांकरितां अंकांऐवजी कांही तरी निराळींच चिन्हे शंभराच्या आकृतीस जोडलेलीं दिसतात.