प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.   

अबकस उर्फ स्थानरेषापट:- जुन्या संख्यालेखनपद्धतींत जी ही सुधारणा घडून आली तिच्या मुळाशीं प्राचीन काळीं ग्रीक व रोमन लोकांत जो अबकस अथवां स्थानरेषापट हिशेबासाठीं वापरण्यांत येत होता असें आढळून आलें आहे तोच असला पाहिजे असें बेली साहेबांनीं आपल्या ‘ अर्वाचीनसंख्यांकांची पूर्वपीठिका ’ नामक ग्रथांत प्रतिपादन केलें आहे. अबकस हा शब्द अबक म्हणजे धूळ ह्या सेमेटिक शब्दापासून सिद्ध झाला असून व्युत्पत्तिदृष्टया त्याचा अर्थ केवळ धूळपाटी असा होईल. लॅटिन वाङ्मयाच्या वैभवकाळांत सुधारलेलें गणनायंत्र प्रचारांत होतें, तरी धूळपाटीचा उपयोग निदान सामान्य लोक तरी केव्हां केव्हां करीत असत अशाबद्दल पर्शिअसच्या व ( पांचव्या शतकांत होऊन गेलेल्या ) मार्शिआनस कापेला ह्याच्या ग्रंथांत उल्लेख सांपडतो. हिशेब करावयाचा असतां ह्या पाटीवर एकावर एक समांतर रेषा आंखून सर्वांत खालच्या ओळीवर एकंचे, तिच्या वरच्या ओळीवर दहंचे तिच्या नंतरच्या वरील ओळीवर शतंचे याप्रमाणें आंकडे लिहिण्याची रीति असावी. पुढें सुधारलेल्या पार्टीत अपूर्णांक दाखविण्यासाठीं व चालू मुख्य नाण्यांची पोटनाणीं दाखविण्यासाठीं, खालीं कांही ओळी आंखूं लागले. ह्या ओळींवर संख्या दाखविणें त्या लेखणीनें पाटीवरील मातींत खुणा करून दाखवीत असले पाहिजेत. यानंतर लांकडाच्या अथवा दगडाच्या पाटीवर कायमच्याच ओळी आंखून तिजवर, आरंभी खडूनें खुणा करून व नंतर गोट्या अथवा सोंगट्या ठेवून हिशेब करण्यांत येऊं लागला. ह्या हिशेबी सोंगट्या ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकांत प्रचारांत होत्या असें पॉलिबिअसच्या एका विधानावरून दिसतें. लिओपोल्ड नामक ग्रंथकारानें ज्या एका रोमन अबकसचें वर्णन केलें आहे तें तर याहूनहि अधिक सुधारलेलें होतें. ह्या अबकसमध्यें एका उभ्या रेषेनें आडव्या ओळींचे एक लहान व एक मोठा असे दोन विभाग केलेले असून पूर्णांकांच्या प्रत्येक ओळींत मोठ्या विभागांत चार व छोट्या विभागांत एक गुंडी ठेविलेली असे. मोठ्या विभागांत ठेविलेल्या गुंडीस स्थानगत किंमतीच्या पांचपट किंमत असल्यामुळें फक्त पांच पांच गुंड्यांनी ह्या दशकात्मक ओळींतील नऊ नऊ राशी दाखवितां येत होत्या. उदाहरणार्थ १३५०९ ही संख्या दाखविण्यासाठी दशसहस्त्राच्या मोठ्या विभागांत एक, सहस्त्राच्या मोठ्या विभागांत तीन, शतकाच्या छोट्या विभागांत एक आणि एकंच्या छोट्या विभागांत एक व मोठ्या विभागांत चार गुंड्या ठेविल्या कीं काम होत असे. सन १८४६ सालीं सलमिस येथें जें ग्रीक अबकस सांपडलें ती तर संगमरवरी दगडाची एक पाटीच असून तत्त्वत: त्यांत व रोमन अबकसमध्यें कांहीच फरक नाहीं. ग्रीक संख्यालेखनांत दहाच्या ऐवजी पांच या संख्येचा उपयोग करीत असल्यामुळें, मोठ्या व छोट्या विभागांत रोमन अबकसप्रमाणें अनुक्रमें चार व एक अशा पांच सोंगट्या ठेवण्याच्या ऐंवजीं दोन व एक अशा तीनच सोंगट्या ठेवून काम भागण्यासारखें होते, ह्या दोन्हीहि (रोमन व ग्रीक) अबकसांची उर्फ स्थानरेषापटांची चित्रे दिली आहेत ती पाहिली असतां त्यांची क्ल्पना नीट सहज रीतीनें होऊ शकेल.