प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
दुसर्या आर्यभटाचे अक्षरांक:- दुसरा आर्यभट ब्रम्हगुप्तानंतर व भास्कराचार्याच्या पूर्वी म्हणजे ख्रिती शतकाच्या अकराव्या शतकाच्या सुमारास होऊन गेला. त्यांने आपल्या आर्यसिद्धांतात नऊ अंक व शून्य या दहा चिन्हांकरितां वर्णमालेच्या पहिल्या दोन वर्गांतील दहा अक्षरें यथानुक्रम घेतलीं असून दुसर्या दोन वर्गांतील दहा अक्षरें पुन्हां त्याच अंकांकरितां यथानुक्रम योजिलीं आहेत [ रूपात्कटपययपूर्वा वर्णा वर्णक्रमादभवन्त्यंका: | ञ्नौ शून्यं प्रथमार्थे आ छेदे ऐ तृतीयाथें || ( आर्यसिद्धांत अधिकार १|२ ) ]. राहिलेल्या व्यंजनांपैकीं पवर्गांतील अक्षरें पहिल्या पांच अंकासाठीं योजिलेलीं आहेत. आर्यसिद्धांताच्या ह्या ‘ कपटयादि ’ क्रमांत स्वरांनां कांहीच अर्थ नसून त्यांतील संख्यालेखनपद्धति, ‘ अंकानां वामतो गति:’ ह्या सर्वसाधारण नियमाच्या उलट आहे. म्हणजे इतर संस्कृत ग्रंथकार एकंचा शब्द प्रथम, मग दहंचा, त्यानंतर शतंचा अशा क्रमानें आपल्या संख्या व्यक्त करितात. तर दुसर्या आर्यभटाच्या पुस्तकांत अंकयुक्त संख्या लेखनपद्धतीप्रमाणें शेवटीं एकंचे अक्षर, दहंचे त्याच्यापूर्वी शतंचें त्याच्याहि अगोदर, असा क्रम पाळला आहे. उदाहरणार्थ, ‘ सप्तर्षीणां कणधझझुझिला मुदयसिनधा यनाख्यस्य ( आ. सि. २|९ ) या सूत्रांतील कणधझझुझिला = १५९९९९३ व मुदयसिनधा = ५८१७९.