प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
दुसर्या आर्यभटाच्या अक्षरांकाचा शिलालेख दानपत्रांतून उपयोग:- वर ज्या दोन अक्षरांकमालांचें विवेचन केलें आहे, त्यापैंकीं पहिल्या आर्यभटाची अक्षरांकमाला त्याच्या ग्रंथाबाहेर दुसरीकडे कोंठेहि दृष्टीस पडत नाहीं. परंतु दुसर्या आर्यभटाचा कटपयादि क्रम कधी कधी शिलालेखांतून [‘ राधवाय = १४४२. (ए.इ.पु.६, पा. १२१;) ‘ भवति ’= ६४४ ( इं. अँ.पु.२ पा. ३६०); ‘ राकालोके ’ = १३१२ ( इं. अँ. पु. २,पा. ६६१)], दानपत्रांतून [‘ शक्त्यालोके ’ = १३१५ ( ए. इं. पु. ३, पा. २९९); ‘ तत्त्वलोके ’ = १३४६ ( ए. इं. पु. ३, पा. ३८)] व पुस्तकांतून [ ‘ खगोन्त्यान्मेषमापे ‘ = १५६५१३२ ( इ. स. ११८४ मध्यें षड्गुरूशिष्यानें सर्वानुक्रमणीवर लिहलेली वेदार्थदीपिका नामक टीका. इं. अँ. पु. २१, पान ५०)] वापरलेला सांपडतो. ह्या उत्तरकालीन लेखकांनीं ‘ कपटयादि ’ क्रमांत एवढाच बदल केला आहे कीं, ते संस्कृत ग्रंथकारांच्या ‘ अंकानां वामतो गति: ’ या नियमानुसारच आपल्या संख्या लिहितात व संयुक्त व्यंजनांतील प्रत्येक घटकावयवास अंकसूचक चिन्हें न समजतां त्यांतील शेवटच्या व्यंजनाशिवाय इतर सर्व निरर्थक [ वरील टीपांमधील ‘ शकत्यालोके, ’ ‘ तत्त्वलोके ’ व खगोन्त्यान्मेषमापे,’ ह्या अक्षरसंख्यामंधील संयुक्ताक्षरांचे अर्थ पहा. उलटपक्षीं आर्यसिद्धांतांतील १|४० मध्ये ‘ क्नकर्णै: ’ = १०१५ आहेत. ] मानतात.