प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.

भारतीय अंक:- सध्यां उपलब्ध असलेले हिंदुस्थानांतील सर्वांत प्राचीन अंक म्हटले म्हणजे अशोकाच्या व नानाघाटच्या लेखांतील अजमासें ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकांतील अंक होत. यांपैकी अशोकाच्या लेखांत दोनशेंकरितां तीन अलग अलग चिन्हें सांपडत असल्यामुळें, अंकांकरितां लिखित चिन्हें वापरण्याची रीति हिंदुस्थानांत अशोकाच्याहि कित्येक शतकें अगोदरपासून प्रचलित असली पाहिजे असें बुहलरच मत आहे. ह्या प्राचीन हिंदी अंकपाठांत, एक, दोन व तीन ह्या संख्यांकरितां अनुक्रमें एक दोन व तीन आडव्या रेषा असून चारापासून नवापावेतोंच्या सहा अंकांकरितां सहा चिन्हें, दहा ते नव्वद पावेतोंच्या दशकाच्या आंकड्यांकरितां नऊ चिन्हें व शंभर व हजार यांकरितां एक एक चिन्ह, अशी एकंदर १८ अलग अलग चिन्ह अथवा अंक होते. ह्यांशिवाय आणखी एक प्राचीन अंकपाठ बाविलोनियन शिलालेखांत दृष्टीस पडतो. यांत एक, दहा व शंभर यांकरितां १-८-१- अशी तीन निरनिराळीं चिन्हें असून, तींच पुन्हां पुन्हां लिहून ह्या शिलालेखांतील सर्व संख्या तयार केल्या आहेत. या अंकपाठांतील लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे, लहान अंक मोठ्या अंकाच्या उजव्या बाजूस लिहिला असतां तो तेवढी अधिक संख्या दर्शवितो, पण डाव्या बाजूस लिहिला तर तो मोठ्या अंकाच्या पटीचा निदर्शक होतो ( उदाहरणार्थ, १-= ११o पण |= १०००). पुढें दिलेल्या आकृतिपटांत इजिप्शियन चित्रलिपीचे पुरोहिती, डेमोटिक, फिनीशियन, पाल्मीरियन, सिरिअक, अशोककालीन व नानाघाटी अंक दिले आहेत त्यांवरून प्राचीन काळांतील निरनिराळे अकंपाठ व संख्यालेखनपद्धती कशा होत्या तें ध्यानांत येईल.