प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.  

शब्दांकांच्या संज्ञा:- प्राचीन हिंदुस्थानांतील हे शब्दांक म्हणजे व्यवहारांतील निरनिराळ्या वस्तूंची किंवा कल्पनांची नांवे असून ते त्या त्या वस्तूंनी किंवा कल्पनांनी ज्या संख्या सुचविल्या जातात त्यांकरितांच नियुक्त केलेले आहेत. एकच संख्या निरनिराळया वस्तूंच्या किंवा कल्पनांच्या नांवांनी सूचित होणें शक्य असून यांपैकी प्रत्येक नांवास कित्येक प्रतिशब्द असणें शक्य असल्यामुळें, एकाच संख्येकरितां अनेक शब्द वापरलेले आढळून येतात. उदाहरणार्थ, शून्याकरितां शून्य, ख, गगन, आकाश, नभ, पूर्ण, रंघ्र इत्यादि; एकाकरितां आदि, शशि, इंदु, विधु, अब्ज, भू, क्षिति इत्यादि;  दोनाकरितां यम, अश्विन, नासत्य, लोचन, दृष्टि, कर, कुच, कुटुंब इत्यादि;  तिनाकरितां राम, गुण, लोक, अग्नि, दहन, होतृ इत्यादि; चाराकरितां वेद, श्रुति, समुद्र, उदधि, केंद्र, वर्ण, आश्रम, युग, कृत, अय, बंधु कोष्ट, इत्यादि; पांचाकरितां बाण, भूत, पर्व, प्राण, पांडव, अर्थ, विषय, तत्त्व, इंद्रिय, रत्‍न, इत्यादि; सहाकरितां रस, काय, ऋतु, मासार्ध, दर्शन इत्यादी; साताकरिता नग, ऋषि, अत्रि, वार, स्वर, धातु, अश्व. छंद, धी, कलत्र इत्यादि; आठकरितां बसु, अहि, गज, सिद्धि, भूति, अनुष्टुभ्, मंगल इत्यादि; नवाकरिता अंक, नंद, निधि, ग्रह, रंध्र, द्वार, गो, पवन इत्यादि; दहाकरितां दिशू, आशा, अंगुलि, रावणशिरस्, अवतार, कर्मन्, इत्यादि; अकराकरिता रुद्र, भर्ग, अक्षौहिणी, इत्यादि; बाराकरिंता रवि, मास, राशि, व्यय इत्यादि; तेराकरिंता विश्वेदेवा:, काम, अतिजगती, अघोष इत्यादि; चौदाकरितां मनु, विद्या, इंद्र, लोक इत्यादि; पंधराकरितां तिथि, घस्त्र, पक्ष, इत्यादि;  सोळाकरितां नृप, अष्टि, कला इत्यादि:  सतराकरितां अत्यष्टि; अठराकरितां कृति; एकोणविसाकरितां अतिधृति ; विसाकरितां नख आणि कृति; एकविसाकरितां उत्कृति, प्रकृति आणि स्वर्ग; बाविसाकरितां कृती आणि जाति:, तेविसाकरिता विकृति, चोविसाकरिता गायत्री, जिन, अर्हत् सिद्ध इत्यादि; पंचविसाकरितां तत्त्व; सत्ताविसाकरितां नक्षत्र, उडुभ इत्यादि; बत्तिसाकरितां दंत, रद इत्यादि; तेहतिसासाठी देव, त्रिदश वगैरे; चाळिसासाठी नरक; आठ्ठेचाळिसासाठीं जगती व एकोणपन्नासासाठीं तान अशा प्रकारचे शब्दप्रयोग आढळून येतात [ पं. ओझाकृत भारतीय प्राचीन लिपिमाला, द्वितीयावृत्ति पान १२० ].