प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.     

स्थानरेषापटाचा जन्मकाल व प्रसार:- स्थानरेषापटाचा शोध किती प्राचीन आहे व त्याचा यूरोपखंडांत केव्हां व कसा प्रवेश झाला याविषयी निश्चित असें कांहीच अनुमान करतां येत नाहीं. बोएशसच्या जॉमेट्रिया नामक ग्रंथांत नऊ अंकी स्थानरेषापटाचा उल्लेख आला असून तें पुस्तक अस्सल आहे असें मॉरिट्झ कँटॉरनें प्रतिपादन केलें आहे. त्याचा युक्तिवाद बरोबर मानला तर पांचव्या शतकांत यूरोपीय लोकांनां हिंदी अंक अवगत असून ते त्यांचा स्थानरेषापटावर उपयोगहि करीत असत असें म्हणणें प्राप्त होतें. जॉमेट्रियानें कोष्टकपद्धतीचें कर्तृत्व ‘ पिथॅगोरिसी’ म्हणजे  ‘ निओ (नूतन) पायथॅगोरिअन्स ’ यांनां दिलेलें आहे. तेव्हां असा एक संभव आहे कीं यूरोप व हिंदुस्थान यांच्या मधील दळणवळणाचा मार्ग चौथ्या शतकांत कुंठित होण्यापूर्वी केव्हां तरी हिंदी अंक व त्यांबरोबरच स्थानरेषापटांतर्गत अंकांच्या स्थानीय किंमतीची कल्पना अलेक्झांड्रियास जाऊन पोंचली असावी; व दहाव्या शतकांत जर्बर्ट यानें मागें पडलेल्या ह्या स्थानरेषापटाचेंच पुनरूज्जीवन केलें असावें. आतां आपण असें जर मानलें कीं शून्यान्वित नऊ अंकी हिंदी संख्यालेखनाचें ज्ञान होण्यापूर्वी पश्चिमेकडील अरबांनी यूरोपीयांपासून बोएशसचे अंक घेतले, तर घोबर अंक, बोएशसचे अंक व अकराव्या शतकांतल्या यूरोपीय हस्तलिखितांतील अंक यांच्या मधील सादृश्याचा उलगडा होईल (वोएप्के). परंतू हें अनुमान ज्या आधारांवर करण्यांत आलें आहे तो अगदींच डळमळीत आहे. प्रथमत: ‘ जॉमेट्रिया ’ ग्रंथाच्याच अस्सलपणाबद्दल शंका घेण्यांत आल्या आहेत. बोएशस व जर्बर्ट यांच्या दरम्यानच्या पांच शतकांच्या काळांत यूरोपखंडामध्यें स्थानरेषापटाचा मागमूसहि सांपडत नाहीं, हा ह्या अनुमानावरील दुसरा आक्षेप आहे. घोबर अंक व पूर्वेकडील अरबांचे अंक यांत म्हणण्यासारखा विशेष फरक नाहीं. व शिवाय हिंदुस्थानांत कधीकाळी स्थानरेषापट अस्तित्वांत होता याबद्दलच अगोदर प्रत्यक्ष असा कांही पुरावा नसून, तो होता असें मानलें तरी तो तेथें केव्हां अस्तित्वांत आला याविषयीं आपणास पूर्ण अज्ञान आहे. अशा स्थितींत कदाचित् असेंहि असूं शकेल कीं, शून्यरहित नऊ अंकी स्थानरेषापटाचें ज्ञान जर्बर्टच्या वेळच्या यूरोपीय लोंकास अरबांकडून प्रथम झालें व शून्यान्वित नऊ अंकी संख्यालेखनाची माहिती त्यांनां मागाहून मिळाली [ब्रिटानिका, पु. १९, पृ. ८६८].

वरील विवेचनावरून संख्यांकांच्या विकासाच्या पायर्‍या येणेंप्रमाणे दिसतात:- संख्यांक पद्धतीचीं दोन अंगे:-

(१) दशकपद्धति व (२) विशिष्ट अंकदर्शन चिन्हें. यांपैकी दशकपद्धतीच्या अगोदर हिंदुस्थानांत दुसरी कोणतीहि पद्धति अस्तित्वांत दिसत नाहीं. या दशक पद्धतीवरून हिंदुस्थानात स्थानरेषापटाची उत्पत्ति होऊन शून्याचें चिन्ह निघालें असावें. विशिष्टअंकदर्शक चिन्हांविषयीं दोन प्रकार दिसून येतात. एक प्रकार म्हटला म्हणजे अक्षरांचा अनुक्रमाच्या आंकड्यांऐवजी उपयोग; व दुसरा प्रकार म्हटला म्हणजे अंकाच्या किंमतीइतक्या रेषा ओढणें. अक्षरांचा आंकड्याऐवजी उपयोग या पद्धतीनें संख्यांकदर्शकें उत्पन्न झालीं असें निश्चयानें सांगतां येत नाहीं.