प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ३ रें.
प्राथमिक  ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.   
 
संख्यालेखनपद्धतीच्या विकासांत स्थानरेषापटाची कामगिरी.- आतां आपण ज्याच्यावर स्थानरेषा दशमानपद्धतीच्या आहेत असें एखादें अबकस, त्यावरील स्थानरेषा उभ्या लंबरूप दिसतील व सर्वात खालची ओळ उजव्या बाजूस येईल अशा रीतीनें ठेविलें, व हिशेबासाठी सोंगट्या वगैरेंचा उपयोग करण्याऐवजी त्या सोंगट्या जे एक, दोन, तीन इत्यादी अंक दर्शविण्यासाठी योजिलेल्या असतात ते अंकच उभ्या रेषांनी झालेल्या घरांत त्या त्या घरांच्या तळाशी लिहून ते डावीकडून उजवीकडे त्या त्या घरांची स्थानगत किंमत हिशेबांत धरून वाचले, तर निरनिराळ्या घरांत आपण ज्या संख्या मांडल्या त्यांची बेरीज केल्यासारखें होईल. अशा रीतीनें अर्वाचीन संख्यालेखनाच्या धर्तीवर पण शून्याची मदत न घेता केवळ नऊच पृथक अंकांच्या साहाय्याने आपणास कोणतीहि संख्या मांडता येईल. स्थानगत किंमतीचा उपयोग केल्याची जी उदाहरणें यूरोपीय ग्रंथांतून सांपडतात त्यांतील अगदी जुनी स्थळें घेतील तर त्या ठिकाणी उभ्या रेषा समांतर काढून त्यांमधून अंक मांड्ले आहेत असेंच दिसून येते. त्या काळी तर ह्या उभ्या रेषांच्या आकृतीला अबकस असें नांव देखील असें. ह्या रेषापटाला ‘आर्कस पायथॉगोरिअस’ असें आणखीहि एक नांव असून फ्रेंचमध्ये त्याला ‘ताब्लोआकोलोन’ म्हणजे दशमान कोष्टक म्हणत.पंधराव्या शतकांत इंग्लंडच्या खजिन्यांत भरावयाच्या पैशांचा हिशेब ज्या चौकटीच्या कापडानें आच्छादिलेल्या टेबलावर करण्यांत येत होता तें ‘चेकर टेबल’ हा स्थानरेषापटाचाच एक प्रकार होता.चौराव्या शतकांत होऊन गेलेल्या चॉसर नामक इंग्रज कवीनें एके जागी पुरोहिताचें वर्णन करतांना (स्थानरेषापटावरील) पाषाणाच्या सोंगट्या त्याच्या पलंगाच्या डोक्याकडें असणार्‍या कपाटावर पडलेल्या असत असें म्हटलें असून शेक्सपियरच्या काळीहिं सोंगट्यांनीच हिशेब करीत असत, असें मानण्यास बराच आधार आहें.

स्थानरेषापटाचें स्वरूप व प्राचीनकाळी त्याचा होत असलेला उपयोग यासंबंधी वर जें विवेचन केलें आहे, त्यावरून शून्याची कल्पना अस्तित्वांत येण्यापूर्वी अंकांना स्थानीय किंमत देऊन निरनिराळी संख्याचिन्हें शक्य तितकी कमी करण्याचा शोध लागला असला पाहिजे हें स्पष्ट होत आहे. स्थानरेषापटाच्या ज्या शेवटच्या स्वरूपाचें वर वर्णन करण्यांत आले आहें, तें अर्वाचीन संख्यालेखनाच्या अगोदरची पायरी आहे. यानंतर मोकळ्या घरांमध्ये काही तरी म्हणजे शून्याचें चिन्ह लिहिण्याची कल्पना सुचतांच, प्रत्येक अंकाचे स्थान ओळखण्यास घरांची आवश्यकता न राहिल्याकारणानें स्थानरेषापट मागें पडून सांप्रतची शून्यांवित नऊ अंकी संख्यालेखनपद्धति उदयास आली.

हिंदुस्थानांत जेव्हां ग्रीकांचें ज्योतिष आणि फलज्योतिष शिरलें तेव्हां त्यांची संख्यापाटीहि फलज्योतिषांचे हत्यार म्हणून शिरली आणि तो शब्द फलज्योतिष्याच्या कोष्टकास लागून आपल्या पंचांगांतील अवकहडा चक्राची उत्पत्ति झाली असावी.