प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
भारतीय शब्दांक:- आतां आपण हिंदुस्थानाकडे वळलों तर असें दिसून येईल कीं, येथें कोणत्याहि प्रकारची अक्षरांकपद्धति अस्तित्वांत येण्याच्या अगोदर शेंकडों वर्षांपासून, मामुली संख्यावाचक शब्दांशिवाय दुसर्या कित्येक सांकेतिक शब्दांचा संख्या दर्शविण्याकरितां वाङ्मयांत उपयोग करण्यांत येत होता. ब्राह्मणांत चाराकरितां ‘ कृत ’ [श. ब्रा. (१३,३,२,१) व तैत्तिरीय ब्रा. (१.५.११,१)], श्रौतसूत्रांत २४ करितां गायत्री व ४८ करितां जगती [कात्यायन श्रौ. सू. वेबरचें संस्करण, पा. १०१५ व लाठ्यायन श्रौ. सू. प्रपाठक ९. कंडिका ४, सूत्र ३१ ] आणि वेदांगज्योतिषांत १,४,८,१२,व २७ ह्यांकरितां अनुक्रमें रूप, अय, गुण, युग व भसमूह हे शब्द [याजुष २३,यार्च ३१; याजुष १३, आर्च४; आर्च १९; याजुष २५ व याजुष २०] वापरलेले आढळतात. पिंगलकाच्या छंद: सूत्रांत [ मंदाकांता,शार्दूलविकीडित, सुवदना, भुंजंगविजृंभित यांचे यती पहा ] असे शब्द ठिकठिकाणीं दिले असून मूलपुलिशसिद्धांतातहि ( शं. बा. दीक्षितरकृत भारतीय ज्योतिशास्त्र पानें १६२-१६३) ते सांपडतात. यांशिवाय वराहमिहिराची पंचसिद्धांतिका (इ. स. ५०५) [ [पंचसिद्धांतिका १२| ५, १|८, ८|१ व १|१५ पहा ], ब्रह्मगुप्ताचा ब्रह्मस्फुटसिद्धांत (इ. स. ६२८) [मध्यमाधिकार श्लोक १६ पहा], लल्लाचें शिष्यधीवृद्धिदतंत्र (आजमासें इ. स. ६३८) [ उत्तराधिकार श्लोक १८ व १९ पहा] ह्या ग्रंथांत व ख्रिस्ती शकाच्या सातव्या शतकानंतरच्या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथांत हे शब्दांक हजारों ठिकाणीं वापरण्यांत आले असून प्राचीन शिलालेखांत धोलपूर येथें मिळालेला चाहमान चंडमहासेनाचा वि. सं. ८९८ चा शिलालेख ( इं. अँ. पु १४, पा. ४५), दानपत्रांत पूर्व चालुक्य दुसरा अम्म ह्याच्या कारकीर्दीतील शके ८६७ चें दानपत्र (इं. अँ. पु ७ पा. १६ ) व संस्कृत हिंदी गुजराथी इत्यादि भाषांतील आधुनिक कवीच्या ग्रंथातील रचनेचे शक यांतहि ते दृष्टीस पडतात.