प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
भारतीय अंकचिन्हांची अक्षरांपासून उत्पत्ति झाली आहे काय:- इ. स. १८३८ मध्यें जेम्स प्रिन्सेप यानें असें सुचविलें होतें कीं, प्राचीन हिंदी अंक हे त्या त्या संख्यावाचक शब्दांची आद्याक्षरें असावीं. ग्रीक लोकांचे प्राचीन अक्षरांकहि अशाच रीतीनें बनविलेले असल्यामुळें वोएप्के आदिकरून यूरोपीय पंडितांनां हें मत लागलेंच पटलें. परंतु पं भगवानलाल इंद्राजी यांनीं आर्यभटाच्या व मंत्र शास्त्राच्या अक्षरांकपद्धतीचें काळजीपूर्वक परीक्षण केल्यावरहि जेव्हां त्यांनां हे अक्षरांक कोणत्या संख्यावाचक शब्दांचीं आद्याक्षरें असावी याचा निर्णय करतां आला नाहीं, तेव्हां बुहलर यानें प्रिन्सेपचें अनुमान अग्राह्य ठरवून पहिले तीन अंक सोडून बाकीचे प्राचीन हिंदी अंक अक्षराकृतीच आहेत असा जो भगवनलाल यांनी मोघम सिद्धांत काढला होता त्यास आपली संमति दिली. पं. गौरीशंकर हीराचंद ओझा यांनी भारतीय प्राचीन लिपिमाला नामक आपल्या ग्रंथाच्या द्वितीयावृत्तीत प्राचीन हिंदी अंकांची निरनिराळ्या काळांतील रूपें तत्कालीन कोणत्या हिंदी अक्षरांसारखी होती याचें काळजीपूर्वक परीक्षण करून शेवटीं असे दाखविलें आहे कीं या हिंदी अंकांचें त्या काळांतील अक्षरांच्या आकृतींशी जें कांही थोडेंबहुत साम्य आढळून येतें तें हिंदी लोकांनीं अंकांकरितां अक्षरांचा उपयोग केला होता म्हणून नसून तें पुढें केवळ आगंतुक कारणांनींच जुळून आलें. ह्या अक्षरसूचक अंकांची संख्या शिलालेखदानपत्रांपेक्षां पुस्तकांच्या हस्तलिखित प्रतींतच विशेषत: अधिक आढळून येते. याचें कारण शिलालेख व दानपत्रें लिहिणारांनां आपण काय लिहितों याचा अर्थ कळत असल्याकारणानें त्यांच्या अंकांत चुका झाल्या नाहींत; परंतु हस्तलिखित पुस्तकांची नक्कल करणारांना प्राचीन लेखांतील कांही अक्षरें व अंक बरोबर न वाचतां आल्यानें त्याच्या नकलांत अशा अक्षरांचीं व अंकांची अशुद्ध रूपें लिहिली गेली हें होय.
जुन्या हस्तलिखितांत अंकांकरितां अक्षरांचा उपयोग करण्यांत जर कांही थोडीशी पद्धती असेल, तर ती फक्त एक, दोन व तीन ह्या अंकांसाठी अनुक्रमे ए, द्वि, त्रि, किंवा स्व, स्ती, श्री, किंवा ॐ, न,म: हीं अक्षरें वापरलेलीं दृष्टीस पडतात, त्या ठिकाणींच होय. परंतु नक्कल करणारांच्या चुकामुंळे ज्या अंकांनां पुढें अक्षरांच्या आकृती प्राप्त झाल्या, त्यांत मात्र कोणत्याच प्रकारचा क्रम पहावयास मिळणार नाहीं. हीं हस्तलिखित पुस्तकें ज्योतिषग्रंथकारांनतरची असल्यामुळें, पहिल्या तीन अंकांकरितां पद्धतशीर अंक वापरण्याची कल्पना काय किंवा इतर अंकांनां मागून अक्षरांची रूपें देण्यांत आलीं ती कल्पना काय, आर्यभटादिकांच्या अक्षरांकावरूनच लोकांना कांही अंशी सुचली असावी असें मानण्यास हरकत नाहीं.