प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
शब्दांक व शून्यान्वित दशमानात्मक संख्या लेखन:- संस्कृतमध्यें ज्योतिष व गणित ह्या शास्त्रांवरील ग्रंथ छंदोबद्ध असल्यामुळें, त्या ग्रंथांतील मोठमोठ्या संख्या श्लोकामध्यें ग्रथित करण्याचा प्रयत्न होत असतां ही शब्दांकांची पद्धति बरीच विकास असली पाहिजे हें उघड आहे. ह्या सर्व आचार्यांनीं, अंकांनां स्थानीय किंमत देऊन शून्य व नऊ अंक अशा दहा चिन्हांवर बसविलेली जी संख्यालेखनपद्धति आज सर्वत्र प्रचलित आहे तिचाच आपल्या ग्रंथांत प्रथम उपयोग केलेला दिसतो. त्यांच्या संख्यांमध्ये एकच आंकडा प्रथम देऊन नंतर त्याच्या पुढें दहंशतमादिआंकडे यथानुक्रम शब्दसंकेतांनी दिलेले असतात. उदाहरणार्थ आकाशपंचवसुपक्ष: ही संख्या घ्या. तिजमधील आकाश, पंच, वसु व पक्ष हे शब्द शून्य, पांच, आठ व दोन ह्या अंकांचे सूचक असून तिचा अर्थ २८५० असा आहे.