विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

- (अर्थनिश्चय) हें वर्णमालेंतील पहिलें अक्षर असून, मूळ र्‍हस्व स्वर आहे.  संस्कृत विशेषणें, विशेष्यें व कृदंतें यांच्या आरंभीं हें अक्षर लावण्यांत येतें. कधीं कधीं निवळ मराठी शब्दांनाहि हें लावितात, पण तें बरें दिसत नाहीं.  या वर्णाचे आशय (अर्थ) किंवा जोर खालील प्रमाणें आहेतः - (१) अभाव किंवा राहित्य : जसें - अपार, अक्षय (२) अपकर्ष, विपर्यासः जसें -अकीर्ति, अकर्म, अनादर, (३) क्षय, कमतरताः जसें -अबोल्या, अबुद्धि, अशिजा (पुरतें न शिजलेलें) (४) वृद्धि, श्रैष्ठ्यः जसें -अमानुष, अपौरुष, अलौकिक (५) मूळ स्थितीला पोंचणेः जसें - असुजणें, अहारणे ( हाररुप नाहींसें होंणें) : पुढें स्वर आला असतां अ चा अन् होतोः उदा.- अनंत, अनक्षर, अनध्याय इ.

वरील पांच अर्थांपैकी पहिल्या अर्थानें हा वर्ण बर्‍याच वेळां उपयोगिला जातो; दुसरा अर्थ पहिल्या इतका आढळत नाहीं; व तिसरा, चौथा आणि पांचवा तर फारच क्वचित् दृष्टीस पडतात; व वर दिलेल्या त्यांच्या उदाहरणांहून जास्त उदाहरणें सापडणें कठिण पडेल.

विष्णूचें नांव; ओम् या अत्यंत पवित्र व गूढ शब्दांतील पहिला ध्वनि (अकरो विष्णुरुदि उकारस्तु महेश्वरः । मकारस्तु स्मृतो ब्रम्हा प्रणवस्तु त्रयात्मकः ॥)

शिव, ब्रम्हा, वायु किंवा वैश्वानर.

अ क्ष रा कृ ति वि का स - अ ह्या अक्षराचें सर्वांत जुनें स्वरुप अशोकाच्या शिलालेखांत पहावयास सांपडतें.  अशोकाच्या कालीं म्हणजे ख्रि.पू. तिसर्‍या शतकांत ह्या अक्षरांचे स्वरुप निराळे होतें व त्यानंतर हल्लीचे स्वरुप त्यास प्राप्‍त होण्यापूर्वी त्याला  या अवस्थांतून जावें लागलें.  यांपैकी पहिलें रुप अशोकाच्या गिरनार येथील शिलालेखांतील आहे. दुसरें ख्रि.पू. पहिल्या शतकाच्या सुमारास कोरलेल्या मथुरेच्या लेखांत पहावयास मिळतें.  त्यामध्यें जच्या डाव्या अंगच्या खालच्या भागांत दोन कोन आले आहेत, व त्यांपासूनच पुढें तिसर्‍या रुपांतील अर्धवर्तुळ तयार झालेलें दिसते.  तिसरें रुप शिवगण नामक राजाच्या इ.स. ७३८ मधील कोटाच्या लेखांतून घेतलें आहे.  तथापि याच्या शंभर वर्षे अगोदरच माळव्यांत अला चौथ्या रुपांत दाखविलेली अवस्था प्राप्‍त झाली होती असें यशोधर्म्याच्या मंदसोर येथील लेखावरुन दिसून येतें.  यापुढें त्या अक्षराच्या डाव्या अंगच्या वरच्या भागास खालच्या भागाप्रमाणे आकार येण्याचेंच केवळ बाकी राहिलें होतें व ती क्रिया चौथ्या आकृतींतील डाव्या अंगच्या उभ्या रेषेवरील शिरोरेषा डाव्या बाजूस वाढून व कोनाच्या ठिकाणी बांकदारपणा येऊन पूर्ण झाली असावी असें कुदारकोट, देवल वगैरे ठिकाणच्या लेखांवरुन दिसतें.

(मोल्स्वर्थ व कँडी-मराठी इंग्रजी कोश; वा. शि. आपटे- संस्कृत इंग्रजी कोश; ओझा- भारतीय प्राचीन लिपिमाला)