विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतपद :- शतपद अथवा गोम व वाणी वगैरे प्राणी अनंतपद ( Myriopoda ) संघ-संधीपाद, या वर्गांत येत असून यांच्यांत व कीटक वर्गांत पुष्कळ साम्य दिसून येतें. विशेषत: वायुनलिकांच्या योगानेंच यांच्यांतील श्वसनक्रिया चालते. यांचें पुष्कळ संधि असलेलें शृंग, नेत्रयुगुल व दोन अथवा तीन दंष्ट्रा इत्यादिकांनी युक्त असें शीर्ष हीं अगदीं सहज ओळखतां येण्याजोगीं असतात. कबंधाचे प्रदेश ओळखूं येत नाहींत. तरी तो भाग पुष्कळ वलयांनी युक्त असा असतो. त्याच्या प्रत्येक वलयाला एक अगर दोन अशा पायांच्या जोड्या लागलेल्या असतात.

कवचधारी व कीटकवर्ग या वर्गांशीं तुलना करितां या वर्गांत प्राणी पुष्कळ कमी आहेत. या वर्गांतील प्राण्यांचे दोन गण पडतात-पहिला गण शतपदांचा ( centipodas ) असून दुसरा युगुल पदाचा (diplopoda) होय. कांहीं शास्त्रज्ञांच मतें '' सीम् फायला '' चतुर्विशतिपद (symphyla) व पॉरोपोडा (Pouropoda) असे याचे आणखी दोन गण आहेत. स्कोलोपेन्ड्रा (scolopendra) अथवा गोमेसारणा विषयुक्त अनंतपद प्राणी हा याचें उदाहरण होय.

गो म :- गोम बहुतेक सर्वांनां माहीत असतेच. यांचा वर्ण काळसर तांबडा असून उन्हाळयांत या पुष्कळ सांपडतात माळावर दगडाखालीं तर या बहुतकरून असतातच. जमीन उकरतांनाहि या आढळतात. या फार चपळ असतात. हिंवाळयांत या स्वत:ला पुरून घेतात. नर अंडीं खातो म्हणून मादी अंडीं नेहमीं जमीनींत झांकून ठेविते.

एखादी गोम जर आपण घेऊन नीटपणें पाहूं लागलों तर तिला प्रथम शीर्ष असून त्यानंतर कबंधाला प्रथम अगदीं लहान वलय असलेलें आढळून येईल. याच्यानंतर कबंधाचीं पंधरा, बावीस वगैरे निरनिराळी वलयें आढळतात. पुणें, जेजुरी वगैरे प्रांतांत या गोमा फार मोठमोठाल्या आढळून येतात. पुष्कळ वेळां एका वलयाच्या पृष्ठार्धावर पिवळा तर दुसर्‍याच्या पृष्ठार्धावर काळा असे एक टाकून एक पट्टे असतात. शीर्षावर लांब लांब शृंगे असतात. या शृंगाच्या पायथ्यांशींच नेत्र असतात. गोम उलटी करून पाहिली असतां तिच्या तोंडाच्या भागांत मुखद्वाराकडे वळलेली बळकट दंष्ट्रांप्रमाणें असलेली एक अवयवांची जोडी दिसून येते. ही विषदंष्ट्राची जोडी असून ती खरोखर पाहिलें असतां प्रथमचरणांची जोडी होय. या दंष्ट्रेचें टोंक खुपसलें असतां वीष आंत टाकलें जातें व भक्ष्य मरतो. चिमटयांनीं जर ही दंष्ट्रा बाजूस काढली तर आंत द्वितीय पार्श्वोष्ठांची जोडी आढळते. हे पार्श्वोष्ठ जरी साधारण पायासारखे दिसत असले तरी त्यांच्यांत थोडा फेरफार झालेला असतो. यांच्याच पुढें प्रथमपार्श्वोष्ठांची जोडी असते व त्यांच्यापुढें खरी दंष्ट्रांची लहान जोडी असते. कबंधाच्या प्रत्येक वलयाला पाठीमागें एक चरणांची जोडी असते.

छेदनक्रियेनंतर आंत पुष्कळशा वातनलिका आढळून येतात. शरीराच्या प्रत्येक अंतर्भागाला प्रत्यक्षपणें प्राणवायु ह्या पुरवितात. यांच्याच योगेंकरून गोमेची श्वसनक्रिया चालते.

हृदय नलिकारूपानें असून ही नलिका पृष्ठभागीं लांबचेलांब असते. मूत्रमयमल बाहेर टाकण्यांकरितां नलिकांचा एक समुदाय बनलेला असतो व त्या नलिका गुदाच्या जरा अलीकडेच त्यांत उघडतात. या महोत्सर्ग नलिकांना '' माल्पिघी '' च्या नलिका (Malpighiantubes) म्हणतात. यांची संख्या कमीजास्त असते.

पचनेंद्रियनलिका सरळ नळीच असून ती शरीराच्या पूर्व टोंकापासून पश्चिमटोंकापर्यंत असते. तिला दोन लालापिंड लागलेले असून ते मुखक्रोडांत उघडतात.

मेंदूवत शीर्षज्ञानकंद शीर्षाच्या भागांत असून त्यापासून दोन ज्ञानरज्जू निघून त्या अन्ननलिकेच्या दोहों बाजूंवरून शरीराच्या उदरतलावर जातात व उदरतलावर असलेल्या ज्ञानकंदाच्या सांखळीशीं संयोग पावतात. नर व मादी निरनिराळीं असतात. त्यांचीं जननेंद्रियस्त्रोतसें शेवटच्या वलयावर उघडतात.

वर वर्णिलेली गोम ही शतपद गणांत येते. या गणांतील प्राणी चपटे असून त्यांच्या शरीराच्या प्रत्येक वलयावर पायांची एकच जोडी असते. कबंधाच्या पहिल्या वलयावर एक विषदंष्ट्रेची जोडी असते.

यु गु ल पा द :- या वर्गांतील दुसरा गण म्हणजे युगुलपाद ( Diplopoda ) हा होय. ह्या दुसर्‍या गणांतील प्राणी पहिल्या गणांतील प्राण्यांपेक्षां बरेच वाटोळे असतात. कंबधाच्या चौथ्या वलयापासून पुढें प्रत्येक वलयास पायांच्या दोन दोन जोडया असतात. विषदंष्ट्रा या प्राण्यांत नसतात. जननेंद्रियांचीं स्त्रोतसें कबंधाच्या तिसर्‍या वलयावर उघडतात. यांची शृंगे लहान असतात. यांना पार्श्वोष्ठांची एकच जोडी असते व खरी दंष्ट्रा असते. पहिल्या व दुसर्‍या कबंधाच्या वलयांना एकएकच पायांची जोडी असते. कबंधाच्या तिसर्‍या वलयाला पाय नसतात. पैसा अथवा वाणी हें या गणाचें उत्कृष्ट उदाहरण होय. आपल्याइकडे पावसाळयांत या प्राण्यांचे थवेच्या थवे आढळतात. हे वनस्पतिभक्षक असून झाडांच्या मुळांना फार त्रास देतात. यांना स्पर्श केला असतां हे शरीर गुरफटून निपचीत पडतात. व शरीराच्या पृष्ठार्धांतून घाणेरडा द्रवपदार्थ बाहेर टाकतात.       - वि. ना. हाटे.