विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अथर्वण :- प्राचीन अग्निउपासक पुरोहितास अथर्वन् असें म्हणत. पुढें हें नांव सरसकट सर्व भिक्षुकांस पडलें. `अथर्वन’हा शब्द पर्शुभारतीय काळचा असून अवेस्तांतील अथ्रवन् याशीं संबद्ध दिसतो. (वेदविद्या पा. ५२ पाहा). ब्राह्मण जातीचा उदय होऊन त्यांच्याकडे पौरोहित्य येण्यापूर्वीं अथर्वण वर्गांकडे भारतीयांचें पौरोहित्य असावें असा एक समज आहे. अथर्वणांचा वेद अथर्ववेद असून त्याच्या शाखा कसकशा पडत गेल्या हें पुढील उतार्यांत दिलें आहे:-
व्यासमहर्षींनी यजुर्वेद महातरुची अथर्वसंज्ञक चौथी शाखा आपल्या अत्यंत तेजस्वी `सुमंतु’नामक शिष्याला सांगितली आणि सुमंतूनें त्याशाखाविभागाचें आपल्या `कबंध’ नामक शिष्याकडून अध्ययन करविलें. कबंधानें त्या संहितेचे दोन शाखाभेद केले आणि देवदर्श व पथ्य या दोन शिष्यांना पढविले. मौद्ग, ब्रह्मबली, शौलकायनि, पिप्पलाद व आणखी दुसरे कित्येक, देवदर्शाचे शिष्य झाले. पथ्याचेहि जाजलि, कुमुदादि व शौनक असे तीन शिष्य संहिताकार झाले. शौनकानें आपली संहिता दोन ठिकाणीं करून एक बभ्रूला व एक सैंधवायनाला दिली. सैंधवायन व मुंजकेश यांच्या शिष्यांनींहि आपआपल्या संहितेचे दोन दोन विभाग केले. श्रेष्ठ अशा आथर्वणांच्या संहितांचे नक्षत्रकल्प, वेदकल्प, संहिताकल्प, आंगिरसकल्प आणि शांतिकल्प असे पांच भेद आहेत. वायु पुराणांत असलेली हकीगत प्राय: अशीच आहे. फक्त सैंधवायनानें आपल्या मुंजकेशनामक शिष्याला आपली संहिता दोन ठिकाणीं विभागून दिली, इतकाच फरक आहे. परंतु त्यानें विष्णुपुराणास विरोध न येतां उलट एकवाक्यता होते. सैंधवायन व मुंजकेश या गुरुशिष्यांच्या पुढे होणार्या शिष्यांनीं आपआपल्या संहितांचे दोन दोन विभाग केले असा विष्णु पुराणांतील श्लोकाचा अर्थ घेतला म्हणजे कांहीं भानगड राहात नाहीं. वायु पुराणांत आलेल्या नांवाचा विष्णु पुराणांतील नांवांशीं किंचित् फरक आहे पण तो फक्त नांवाचा आहे. मौद्गलाला मौद म्हटलें आहे, शौलकायनीला शौष्कायनि म्हटलें आहे व देवसर्शाच्या जागीं वेदस्पर्श आला आहे, एवढेंच काय तें. पंचकल्पांपैकीं दुसरा कल्प जो `वेद’ त्याच्या ऐवजीं `वैतान’ असें नांव आलें आहे. अथर्ववेदतरूच्या एकंदर ९ शाखा विस्तारल्या व त्याला पाच कल्परुपी फळें लटकलीं. चरणव्यूहामध्यें थर्वसंहिता भेदाच्या नांवाची यादी आहे ती अशी:- पिप्पल, दान्त, दामोदांत, औतपन, जावाली, शौनक, ब्रह्मपलाश व देवदर्शी आणि चारणविद्य खेरीज कल्पापैकीं वैतानास `विधानकल्प’ व आंगिरसकल्पास `अभिचारकल्प’ असा नांवांत फरक आहे. (`स्वाध्याय’ वर्ष १ ले, अंक १ ला.)
अथर्वणांचा वैदिक इतिहास तिसर्या विभागांत आलाच आहे. सध्यां हिंदुस्थानांत या वर्गाचें अस्तित्व बहुतेक नष्ट झालें असून कोठेंकोठें यांचे अवशेष दिसून येतात.
अ थ र्व वे दी ब्रा ह्म णां सं बं धी आ धु नि क मा हि ती – या प्राचीन वर्गांची सध्यांची महाराष्ट्रांतली स्थिति लक्षांत येण्यासाठीं सातारा जिल्ह्यांतील चिंधवली गांवी राहाणार्या रा. अंताजी काशीनाथ कुळकर्णी ( काळे ) या अथर्वण शाखीय गृहस्थांनीं पुढील माहिती दिली आहे. रा. कुळकर्णी यांचें घराणें चिंधवलीस दोन तीनशें वर्षांपासून आहे, त्यांचें गोत्र भालंदन, व प्रवर काश्यप, आवत्सार, नैध्रुव असे आहेत. यांचे कुलगुरु नागेश भट बि. बाळंभट जोशी नांवाचे कौशिक गोत्री माहुलीकर ब्राह्मण होते. भालंदन गोत्राखेरीज भारद्वाज, उपमन्यू, कौशिक व शावास्य ( श्यावाश्व ? ) ही त्यांच्या शाखेचीं गोत्रें होत. चिंधवलीस अथर्वणांचीं तीन घरें आहेत, कांही मलवडीस आहेत. यांचे धर्मविधी गेलीं १५।२० वर्षे यांच्या शाखेप्रमाणें होत नाहींत. या शाखेचे विधी करणारे ब्राह्मण हल्ली सांगली व ग्वाल्हेर संस्थानांत आढळतात. रा. कुळकर्णी यांना त्यांच्या शाखेच्या ब्राह्मणांची वस्ती कोठें कोठें आहे असें विचारितां त्यांनीं पुढील ठिकाणें सांगितलीं.
१ वाई तालुका : - चिंधवली. २ सातारा तालुका:- माहुली संगम, चिंचणेरे- महागांव. ३ कोरेगांव तालुका:- जायगांव. ४ माण तालुका:- मलवडी, दहिवडी, बिदाल, महिमानगड. ५ खटाव तालुका:- मोळ, दिसकळ, बूध, पुसेगांव, कडगुण, खटाव, खादगुण, जाखणगांव, अंभेरी, जायगांव, निढळ उंबरमळे, कुरवली (सिद्धेश्वराची), कातरखटाव. ६ सांगली संस्थान. ७ पुणें जिल्हा. काशी, प्रयाग, गया, लष्कर इत्यादि ठिकाणींहि यांची तुरळक वस्ती आहे.
महाराष्ट्रांत या शाखेचें शरीरसंबंध देशस्थ, क्वचित कर्हाडे ब्राह्मण, ॠग्वेद,-अथर्वण,- आपस्तंब शाखीय, यांच्याशीं होतात. आपला वेद सर्वांत वडील असल्याचें हे ब्राह्मण मानतात. या वेदाचें आधिदैवत्य भार्गवरामाकडे दिलें जातें. पूर्वी श्री. छत्रपति सरकार यांनीं या ब्राह्मणांची परीक्षा करण्याचें योजिलें असतां नैवेद्याच्या पदार्थांचीं फुलें झालीं व छत्रपतींनीं या ब्राह्मणांना मोठीं वेतनें दिलीं अशी आख्यायिका सांगतात. श्राद्धपक्षांत पितरांचा नामोच्चार करितांना प्रथम पणजे, मग आजे व नंतर शेवटीं वडील म्हणजे आदित्य, रुद्र, वसुरुप: अशी परंपरा म्हणतात. सांगली संस्थानांत शावास्य गोत्री बापूआणा मोरे या नांवांचे गृहस्थ मोठे विद्वान् आहेत.